
वासा-शेवगाव राज्य मार्गावरील भेंडा येथील साखर कारखान्याच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर खड्डे चुकविताना एका कारची रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या कारला समोरून जोराची धडक बसली.
या भीषण अपघातात एअरबॅग फुटून रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या एकाचा जागीच मृत्यू झाला, तर एक जण गंभीर जखमी झाला. मंगळवारी (दि. 9) सायंकाळी पाचच्या सुमारास हा अपघात झाला.
भेंडा बुद्रुक येथे कारखान्याच्या प्रवेशद्वारासमोर ज्ञानेश्वर स्विट मार्टजवळ एक कार (एमएच 12 बीसी 4200) उभी होती. या कारला शेवगावहून नेवाशाकडे भरधाव जाणार्या कारची (एमएच 17 सीआर 4291) जोराची धडक बसली.
या अपघातात जोराचा आवाज होऊन धडक देणार्या कारमधील एअरबॅग फुटली व त्याच्या आघाताने रस्त्यावरून जाणारे सुरेश यादव आढागळे (वय 48 रा. नागापूर, ता.नेवासा) उडून रस्त्यावर आदळले. त्यात ते जागीच ठार झाले, तर मनोज रामभाऊ अस्वले (वय 45, रा. भेंडा) हे गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने नेवासा फाटा येथील रुग्णालयात व तेथून छत्रपती संभाजीनगर येथे हलविण्यात आले.