नंदुरबार : घोड्याची किंमत ऐकून तुम्हीही व्हाल थक्क! तब्बल १५ कोटींचा ‘बिग जास्पर’ सांरगखेडाच्या जत्रेत दाखल
आपण आजवर कोटीमध्ये वाहनांची किंवा बंगल्यांची किंमत ऐकली असेल मात्र प्राण्यांची किंमत आणि तीही कोटीमध्ये कदाचित आपल्याला विश्वास बसणार नाही. मात्र हे सत्य आहे. कारण कार किंवा घरांच्या किंमतीपेक्षाही अधिक महत्व आता काही प्राण्यांना प्राप्त झालं आहे. आलिशान मोटारींपेक्षाही मोठी किंमत ‘बिग जास्पर’ या अश्वाची आहे. हाच ‘बिग जास्पर’ नंदुरबार जिल्ह्यातील सारंगखेडा येथील चेतक फेस्टिव्हलमध्ये यंदाचा सर्वांत मोठा सेलिब्रेटी ठरणार असून हा अश्व चेतक फेस्टिवलमध्ये दाखल झालाय.
‘बिग जास्पर’ची स्वतंत्र व्हीआयपी व्यवस्था आयोजकांकडून करण्यात आली असून ‘बिग जास्पर’ हा अश्व येथील चेतक फेस्टिव्हलमध्ये विशेष आकर्षण ठरत आहे. यात्रोत्सवानिमित्त भरणारा अश्व बाजार देशाच्या घोडे बाजाराचे नेतृत्व करतो. या अश्व बाजारात चेतक फेस्टिव्हलची जोड मिळाली आहे. या अश्व बाजारात तीन हजारांहून अधिक अश्व येतात. त्यापैकी पाचशेहून अधिक घोड्यांची किंमत लाखांवर असते. आतापर्यंत अश्व बाजारात १० कोटीपर्यंत घोडा आला आहे. यंदा मात्र त्या किंमतीचा विक्रम मोडणार आहे.
‘स्टॅलियन बिग जास्पर’ याला पंजाब येथील बादल स्टडचे राजहंस यांनी प्रशिक्षण दिले आहे. पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखविंदर सिंग बादल आणि संजमसिंग बादल यांनी सांभाळ केला. हा अश्व अहिल्यानगरचे माजी आ. अरुण जगताप, संग्राम जगताप, सचिन जगताप यांच्या मालकीचा आहे. महाराष्ट्रातील सर्वात उंच ७० इंच उंचीचा हा अश्व आहे. याची किंमत तब्बल १५ कोटी रुपये ठेवली असून हाच ‘बिग जास्पर’ यंदाच्या चेतक फेस्टिवलचा विशेष आकर्षण ठरत आहे.
अशी घेतली जाते ‘बिग जास्पर’ची काळजी
महाराष्ट्रातील सर्वात उंच घोडा असून याची उंची ७० इंच इतकी आहे. विशेष म्हणजे त्याच्यापासून विविध घोडींनी आतापर्यंत सर्वात उंचीचे पिल्ल जन्माला घातले आहे. घोड्यांची देखभाल करताना इतर घोडेमालक त्याच्या खुराकबद्दल अव्वाचं सव्वा सांगतात. मात्र, आमचा घोडा बोरवेलचे पाणी पितो आणि करड्याची कुट्टी व चने रोजचा खूराक आहे. या घोड्याची किंमत १५ कोटी असून याला ती किंमत मिळाल्यास आम्ही नक्कीच त्याची विक्री करू, असे केशव जोशी यांनी सांगितले.