उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबद्दल अवमानकारक वक्तव्य केल्याप्रकरणी भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी लीगल सेलने न्यायालयात धाव घेतली आहे. हा दावा दाखल करून घेण्यात आला आहे.
त्यावर नंबर पडला आहे. न्यायालयात पुढील कार्यवाही करण्यात येणार आहे. ई-मेलद्वारे गृह खाते, तर पुणे पोलीस आयुक्तांकडे अर्जाद्वारे आणि सहकारनगर पोलीस स्टेशन येथे लेखी तक्रार दाखल करून गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली.
मात्र, कोणीही दाद दिली नाही. त्यामुळे न्यायालयात धाव घेतल्याची माहिती राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीच्या लीगल सेलचे अध्यक्ष ऍड. विवेक भरगुडे यांनी केली. त्यांना ऍड. वैशाली चांदणे, ऍड. कुमार पायगुडे आणि ऍड. चेतन भुतडा यांनी मदत केली.
“अजित पवार यांना उपमुख्यमंत्री मानता की नाही, त्यांच्यामार्फत कामे होणार असे वाटते का’ अशी विचारणा पडळकर यांना पत्रकारांना केली. त्यावेळी त्यांनी “त्यांची भावना आमच्याविषयी स्वच्छ नाही.
त्यामुळे आम्ही त्यांना पत्र देण्याची गरज नाही. लबाड लांडग्याचे लबाड पिल्लू आहे ते. त्यामुळे आम्ही त्यांना मानत नाही. पुढे त्यांची आम्हाला आवश्यकता नाही.
ज्याच्यामुळे आम्हाला न्याय मिळू शकतो. त्या दोघांना मी पत्र लिहले आहे’ असे वक्तव्य केले आहे. या पार्श्वभूमीवर पडळकर यांनी हेतूपूर्वक अजित पवार यांच्याविषयी जनतेच्या मनातील प्रतिमा मलिन करण्यासाठी हे वक्तव्य केले आहे.
त्यामुळे जनतेमध्ये असंतोषाची भावना आहे. आमदार पदावर काम करणाऱ्या व्यक्तीने असे वक्तव्य करणे योग्य नाही. त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखलकरण्यासाठी न्यायालयात धाव घेतल्याचे ऍड. भरगुडे यांनी सांगितले.