G20 परिषदेचे यजमानपद यावर्षी भारताला मिळाले आहे. त्यामुळे भारताने देशाच्या विविध भागात G20 च्या बैठका आयोजित केल्या आहेत. यामध्ये भारताला एक मोठे राजनैतिक यश मिळाले आहे.
G20 प्रतिनिधींची एक बैठक भारताने जम्मू-काश्मीरमध्ये आयोजित केली आहे. चीन-पाकिस्तानच्या आवाहनाला धुडकावून लावत 17 देशातील 60 प्रतिनिधींनी या बैठकीत सहभाग घेतला.
बैठकीत युरोपियन युनियनसह या देशांचा सहभाग म्हणजे जम्मू-काश्मीर हा त्यांच्यासाठी वादग्रस्त मुद्दा राहिलेला नाही, हे अधोरेखित झाले आहे.
जम्मू काश्मीरमधील G20 च्या बैठकीचे महत्व जम्मू काश्मीरमध्ये G20 ची बैठक आयोजित करणे हे भारताच्या राजनैतिक रणनीतीचा एक महत्वपूर्ण भाग मानला जात आहे.
जम्मू-काश्मीरवरून भारत पाकिस्तानमध्ये वाद आहेत. त्यातच कलम 370 रद्द केल्यानंतर पाकिस्तानने या मुद्द्याचा वेळोवेळी आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये मांडले होते.
त्यातच चीनने पाकिस्तानला साथ देऊन जम्मू काश्मीर वादग्रस्त भाग असून श्रीनगर येथील आयोजित G20 च्या बैठकीवर बहिष्कार घालण्याचे आवाहन केले होते.
चीनच्या या आवाहनावर भारताने कडक प्रतिक्रिया देऊन जम्मू काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग असून देशाला भारताच्या कोणत्याही भागात बैठक बोलवण्याचा अधिकार आहे, असे ठणकावून सांगितले.