BIG NEWS : बृजभूषण यांचा होणार ‘करेक्ट कार्यक्रम’? 

Photo of author

By Sandhya

बृजभूषण

भारतीय कुस्ती संघाचे (डब्ल्यूएफआय) प्रमुख, भाजप खासदार बृजभूषण शरण सिंह यांच्या विरोधात गेल्या अनेक दिवसांपासून अधिक काळ आंदोलन करणारे कुस्तीपटू सोमवारी (दि.५) आपल्या कर्तव्यावर परतले. साक्षी मलिक, विनेश फोगाट आणि बजरंग पूनिया रेल्वे सेवेत पुन्हा रुजू झाले.

दरम्यान, कुस्तीपटू कामावर रुजू होताच साक्षी यांनी आंदोलनातून माघार घेतल्याचे वृत्त पसरले होते. परंतु हे वृत्त खोट असून संघर्ष सुरूच राहणार असल्याचे साक्षी यांनी ट्विट करीत स्पष्ट केले.

न्यायाच्या लढाईत आमच्या पैकी कुणी माघार घेतलेली नाही आणि घेणारही नाही. सत्याग्रहासोबतच आम्ही रेल्वेतील आमची जबाबदारी पार पाडत आहोत. न्याय मिळेपर्यंत आम्हची लढाई सुरू राहील. कृपया चुकीचे वृत्त पसरवू नये,असे आवाहन मलिक यांना ट्विटरवरून करावे लागले.

आंदोलन मागे घेण्यात आल्याचे वृत्त खोट असून आंदोलनाला नुकसान पोहचवण्यासाठी ते पेरण्यात आल्याचा आरोप बजरंग पुनिया यांनी केला. आम्ही माघार घेतली नाही.

महिला कुस्तीपटूंनी गुन्हा मागे घेतल्याचे वृत्त देखील खोडसर आहे. न्याय मिळेपर्यंत लढाई सुरू राहील,असे ट्विट पुनिया यांनी केले. दरम्यान, कामावर रुजू होण्यापूर्वी आंदोलक कुस्तीपटूंनी शनिवारी उशिरा रात्री केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेत जवळपास २ तास चर्चा केली होती.

आपल्या कर्तव्यावर पुन्हा रुजू होण्याची विनंती या भेटीदरम्यान शहांकडून केली गेल्यानंतर कुस्तीपटू कामावर परतले असल्याची चर्चा आता सुरू झाली आहे.

शहांनी कुस्तीपटूंसोबत घेतलेली भेट आणि आता कुस्तीपटूंची कामावर वापसी मुळे लवकरच खा.सिंह यांच्यावर कारवाई होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

सिंह यांच्यावर पक्षश्रेष्ठीही नाराज असल्याचे बोलले जात आहे. त्यांच्या समर्थनार्थ संतांची रॅली देखील रद्द करण्यात आली आहे. अशात सिंह यांच्याविरोधातील कारवाईचा मार्ग मोकळा झाला असल्याचे बोलले जात आहे.

दरम्यान, २८ मे रोजी संसदेच्या दिशेने कुच करणाऱ्या महिला कुस्तीपटूंचे आंदोलन पोलिसांनी चिरडल्यानंतर देशात सरकारविरोधात रोष निर्माण झाल्याचे चित्र निर्माण झाले होते. हरियाणातील खाप पंचायत ने कुस्तीपटूंना समर्थन देत आंदोलनाचा इशारा दिला होता.

यानंतर महापंचायत देखील भरवण्यात आली होती. याअनुषंगाने सरकारची प्रतिमा आणखी डागाळू नये यासाठी सरकार आता खा.सिंह प्रकरणात वेगाने पावले उचलत असल्याची चर्चा दिल्लीत रंगली आहे.

Leave a Comment