राज्यात निवडणूका जाहीर झाल्यापासून राज्याचे राजकारण मोठ्या प्रमाणात तापले आहे. महाविकास आघाडी व महायुतीकडून उमेदवारांची यादी जाहीर होत असून महायुतीने आत्तापर्यंत 182 उमेदवारांच्या नावांची घोषणा केली आहे तर महाविकास आघाडीतील शिवसेना युबीटी पक्षाने 65 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली तर काँग्रेस आणि शरद पवार गटाची यादी अद्याप जाहीर झालेली नाही.
दुसरीकडे मनोज जरांगे पाटील यांच्याकडेही इच्छुक उमेदवारांची गर्दी वाढत असून रात्री उशिरापर्यंत त्यांना भेटून मतदारसंघातील राजकीय परिस्थिती व उमेदवारी मिळावी म्हणून इच्छुकांकडून मागणी केली जात आहे. यादरम्यान मनोज जरांगेंना अज्ञात व्यक्तीकडून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. यामुळे मोठी खळबळ उडाली आहे.
काय म्हंटले धमकीमध्ये? एका युट्यूब चॅनलच्या कॉमेंटमध्ये अज्ञाताकडून ही धमकी देण्यात आली असून कॉमेंटचा स्क्रिन शॉट सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. उमेदवारीसाठी इच्छुक म्हणून येऊन गेम करणार अशा आशयाची ही धमकी असल्याचं कॉमेंटमध्ये लिहिण्यात आलं आहे.
बजाज बिश्नोई लीडर नावाच्या फेक अकाऊंटवरुन ही धमकी देण्यात आली आहे. बंदोबस्तामध्ये वाढ ही धमकी मिळाल्यानंतर मनोज जरांगे सध्या बसत असलेल्या सरपंच मळा येथील बैठकीच्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. तसेच मनोज जरांगेंच्या भेटीसाठी येणाऱ्या उमेदवारांची किंवा बैठकी दरम्यान आतमध्ये जाणाऱ्या सर्वांची आता तपासणी केली जाणार आहे.