मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांनी विधानसभा निवडणुकीतून माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे. एका जातीवर निवडणूक लढणे आणि जिंकणे शक्य नाही. त्यामुळे समाज बांधवांनी आपले अर्ज काढून घ्यावे. उमेदवार द्यायचा नाही, आता कोणाला पाडायचे ते पाडा आणि कोणाला आणायचे ते आणा, असे आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी आज केले आहे.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 3 नोव्हेंबर रोजी रविवारी कोणत्या मतदारसंघांमध्ये निवडणूक लढवणार, याची माहिती मनोज जरांगे पाटील यांनी दिली होती. मात्र आता त्यांनी विधानसभा निवडणुकीतून माघार घेतली आहे.
जरांगेंनी निवडणूक लढवणार असल्याचं जाहीर केल्यानंतर ते आज आपल्या उमेदवारांची यादी जाहीर करतील अशी अपेक्षा होती. मात्र त्यांनी एका दिवसातच या निवडणुकीमधून माघार घेण्याची घोषणा करत सर्वांनाच धक्का दिला आहे.
मनोज जरांगे काय म्हणाले? “मित्र पक्षांनी यादी न पाठवल्याने आपण माघार घेत आहोत. यादीच नाही म्हटल्यावर लढायचं जमेल का? एका जातीवर कस निवडून यायचं? यादी न आल्यामुळे नाईलाजाने एका जातीवर जिंकणे शक्य नाही त्यामुळे थांबण्याचा निर्णय घेतला. आम्ही माघार घेतलेली नाही. हा गनिमी कावा आहे.
त्यामुळे समाज बांधवांनी आपले अर्ज मागे घ्यावेत,” असे आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी केले आहे. “महाविकास आघाडी असो किंवा महायुती असो दोन्हीकडचे नेते सारखेच आहेत.
त्यामुळे कोणाला पाठिंबा देणार नाही. तसेच कोणालाही निवडून आणा, असे देखील सांगणार नाही. आपण कुणाच्याही प्रचाराला, सभेला जायचे नाही, मतदान करून मोकळ व्हायचं,” असेही मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले. माझ्यावर कोणाचाही दबाव नाही – जरांगे
मराठा आरक्षणाच्या आंदोलनाला पुन्हा सुरुवात करणार असल्याचेही यावेळी जरांगे यांनी स्पष्ट केले आहे. “निवडणूक संपली की आपलं आंदोलन सुरु करणार आहोत. पुन्हा आपल्या जातीसाठी आपण लढू. याला पाड आणि त्याला पाड म्हणायची माझी इच्छा नाही कारण जिंकून कोणी तिसराच येईल.
कोणाच्याही प्रचाराला मला जायचं नाही. तसेच, आमचा कोणत्याही पक्षाला, अपक्ष उमेदवाराला पाठिंबा नाही. माझ्यावर महायुती किंवा मविआ, कोणाचाही दबाव नाही,” असंही मनोज जरांगे यांनी स्पष्ट केले आहे.