मोठी बातमी! चेंगराचेंगरीनंतर महाकुंभमध्ये भीषण आग, भाविक घाबरले; आग विझवण्याचे युद्धपातळीवर प्रयत्न सुरू

Photo of author

By Sandhya


प्रयागराजमध्ये सुरू असलेल्या महाकुंभमध्ये चेंगराचेंगरी होऊन तब्बल 25 जणांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच आता महाकुंभमध्ये मोठी आग लागली आहे. त्यामुळे भाविकांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. आग विझवण्याचं काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आलं आहे. सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही. मात्र, आग अद्यापही आटोक्यात आलेली नाही. महाकुंभमध्ये एकामागून एक दुर्घटना घडत असल्याने भक्तांमध्ये चांगलीच खळबळ उडाली आहे.

महाकुंभमधील सेक्टर 22मध्ये बनवलेल्या एका तंबूला ही आग लागली आहे. या ठिकाणी अग्निशमन दलाच्या गाड्या आल्या असून आग विझवण्याचं काम सुरू आहे. पण अजूनपर्यंत आगीवर नियंत्रण आणण्यात आलेलं नाही. सुदैवाची गोष्ट म्हणजे आग लागली तेव्हा एकही भाविक तंबूत नव्हता. आग लागताच सर्वजणांनी तंबूच्या बाहेर पळ काढला होता. त्यामुळे मोठी दुर्घटना होता होता वाचली आहे.

महाकुंभचा हा सेक्टर 22 परिसर झूसीच्या छतनाग घाट आणि नागेश्वर घाटाच्या मध्ये आहे. आज दुपारी अचानक अनेक तंबूंनी पेट घेटला. त्यामुळे तंबूत असलेले भाविक घाबरून बाहेर पळाले. ही आग अत्यंत भीषण असल्याचं सांगितलं जात आहे. कापडी तंबू असल्याने आणि हवा असल्याने आग अधिकच भडकली. यावेळी अग्निशमन दलाला तात्काळ माहिती देण्यात आली. अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी युद्धपातळीवर आग विझवण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. या आगीत असंख्य तंबू जळून खाक झाले आहेत. मात्र, कोणतीही जीवित हानी झाली नसल्याचं सांगण्यात आलं.

आधीही लागली होती आग
या आधी 19 जानेवारी रोजीही महाकुंभमध्ये आग लागली होती. सेक्टर 19मधील गीता प्रेसच्या तंबूंना ही आग लागली होती. त्यावेळीही अनेक तंबू जळून खाक झाले होते. यावेळी सिलिंडर स्फोट झाला होता. त्यामुळे आग चांगलीच भडकली होती. हवेत धुराचे लोळ दिसत होते. मात्र, त्यावेळीही अग्निशमन दलाच्या जवानांनी प्रसंगावधान राखून आगीवर नियंत्रण मिळवलं होतं. त्यामुळे एक मोठी दुर्घटना होता होता वाचली होती.

त्यानंतर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली होती. तसेच तात्काळ मदत देण्याचे आदेशही दिले होते. त्यानंतर प्रशासनाने या ठिकाणी रातोरात नवीन तंबू उभारले होते. आणि पीडितांच्या राहण्याची व्यवस्था केली होती.

मौनी अमावस्येलाही आग
मौनी अमावस्या स्नानाच्या दिवशीही या ठिकाणी आग लागली होती. तसेच या ठिकाणी चेंगराचेंगरीही झाली होती. चेंगराचेंगरीनंतर महाकुंभमेळा क्षेत्रातून रुग्णवाहिकेतून जखमी भाविकाला रुग्णालयात नेलं जात होतं. त्यावेळी ही आग लागली होती. रुग्णवाहिकेच्या इंजिनमधून धूर निघाला आणि आग भडकली. त्यामुळे संपूर्ण रुग्णवाहिका आगीच्या भक्ष्यस्थानी पडली होती. त्यावेळी परिसरातील लोकांनी तात्काळ आगीवर नियंत्रण आणण्याचं काम केलं होतं.

Leave a Comment