भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांचा गेल्या अनेक दिवसांपासून पक्षाबद्दल नाराजीचा सूर पाहायला मिळत आहे. त्यामुळे पंकजा मुंडे लवकरच भाजपमधून बाहेर पडतील अशा चर्चा सुरु झाली आहे.
तसेच बुधवारी (31 मे) रोजी एका कार्यक्रमध्ये पंकजा मुंडे यांनी केलेल्या वक्तव्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
त्या म्हणाल्या की ‘मी भाजपमध्ये आहे. पण, भाजप थोडीच माझा आहे, काहीच नाही मिळालं तर ऊस तोडायला जाईल…’ त्यामुळे पंकजा मुंडे पक्षामध्ये नाराज असून त्या लवकरच राष्ट्रवादीमध्ये जाणार असल्याच्या चर्चा सध्या रंगल्या आहेत.
यावर आता राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीही प्रतिक्रिया दिली आहे.
जयंत पाटील म्हणाले, “जर आणि तर या प्रश्नाला कधीच उत्तर देऊ नये. ज्यावेळी जर होईल त्यावेळी आम्ही तरचे उत्तर देऊ. आमचे अनेक सहकारी भाजपमध्ये गेले आहेत, त्यामुळे त्या लोकांना कुठे बसवायचे हा प्रश्न राहिला आहे. त्यामुळे निष्ठावंत मागे ढकलले गेले आहेत,” असेही ते म्हणाले.
काय म्हणाल्या होत्या पंकजा मुंडे ?
“मी भाजपची आहे, पण भाजप पक्ष माझा थोडाच आहे. भाजप खूप मोठा पक्ष आहे, मी फक्त त्यामध्ये काम करते. गोपीनाथ मुंडे यांनी मोठं काम केलं. मुंडे साहेबांनी अनेक आमदार, खासदार बनवले.
यामुळे आता सरकार स्थापन करण्यापर्यंत प्रवास केला. मुंडे साहेब नेहमी म्हणायचे मी कधीही कुणासमोर झुकणार नाही, भीती वाटणं हे आमच्या रक्तातच नाही. आम्ही कुणाला घाबरतच नाही, काही मिळालं नाहीतर मी ऊस तोडीसाठी जाईल”, असे पंकजा मुंडे म्हणाल्या होत्या.