कसब्याचे आमदार आणि पुणे लोकसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्यावर पुण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पुणे पोलिसांनी धंगेकर यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
दोन दिवसांपूर्वी रवींद्र धंगेकर यांनी सहकार नगर पोलीस ठाण्यात जाऊन भाजप विरोधात आंदोलन केले होते. बेकायदेशीर पद्धतीने जमाव केल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.
पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी याप्रकरणी जो कायदा व सुव्यवस्था बिघडवेल त्यावर गुन्हा दाखल होईल अशी ग्वाही दिली होती. त्यानंतर हा गुन्हा दाखल झाला आहे.
रवींद्र धंगेकर यांनी मतदानाच्या एक दिवसआधी म्हणजे १२ मे रोजी सहकार नगर पोलीस ठाण्यात जाऊन आंदोलन केले होते. भाजपकडून पैसे वाटप केले जात असल्याचा आरोप त्यांनी केला होता.
मिळालेल्या माहितीनुसार, रवींद्र धंगेकर यांच्यासह ३५ ते ४० कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल झाला आहे. कलम १४३, १४५, १४९, १८८ व महाराष्ट्र पोलीस अधिनियम सन १९५१ चे कलम १३५, लोकप्रतिनीधी अधिनियम १९५१ चे कलम १२६ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांच्या आदेशाला केराची टोपली दाखवत त्यांनी भाजप विरोधात आंदोलन केले होते.