BIG NEWS : पुण्यातील ४२ गुंड तडीपार; निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर पोलिस आयुक्तांची मोठी कारवाई…

Photo of author

By Sandhya

पुण्यातील ४२ गुंड तडीपार; निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर पोलिस आयुक्तांची मोठी कारवाई

लोकसभा निवडणुकीत कोणताही गैरप्रकार होऊ नये, यासाठी कोंढवा, वानवडी, मुंढवा, हडपसर, लोणी काळभोर यासह उपनगरातील सराईत गुन्हेगारांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. सात पोलिस ठाण्यांतील ४२ सराईत गुन्हेगारांना पुणे, पिंपरी-चिंचवडसह जिल्ह्यातून हद्दपार केले आहे.

हद्दपार केलेल्या गुन्हेगारांमध्ये चार टोळी प्रमुखांचा समावेश आहे. कोंढवा, मुंढवा, हडपसर, बिबवेवाडी, मार्केट यार्ड, वानवडी आणि लोणी काळभोर भागांत गुन्हेगारांची दहशत वाढली आहे. शहरातील पोलिस ठाण्याची पाच परिमंडळांमध्ये विभागणी केली आहे.

यामध्ये सर्वाधिक मोठे कार्यक्षेत्र परिमंडळ पाचचे आहे. या भागांत गंभीर गुन्ह्यांचे प्रमाण अन्य परिमंडळांच्या तुलनेने जास्त आहे. त्यामुळे परिमंडळ पाचमध्ये कारवाई करण्यात आली.

शहरात काही महिन्यांपूर्वी कोयता गॅगने दहशत माजविली होती. सुरुवातीला हडपसर भागात कोयत्याने वार केल्याचे अनेक प्रकार घडले होते. त्या पार्श्‍वभूमीवर पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी शहरातील गुंडांविरुद्ध कडक कारवाई करण्याचा आदेश दिला आहे.

परिमंडळ पाचचे पोलिस उपायुक्त आर. राजा, सहाय्यक पोलिस आयुक्त अश्‍विनी राख, गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली ४२ सराईत गुन्हेगारांना तडीपार केले आहे.

Leave a Comment