BIG NEWS : शिंदे गटाचे आमदार अनिल बाबर यांचे निधन

Photo of author

By Sandhya

शिंदे गटाचे आमदार अनिल बाबर यांचे निधन

शिंदे गटातील खानापूर-आटपाडी विधानसभा मतदारसंघाचे आमदार अनिल बाबर यांचे वयाच्या 74 व्या वर्षी निधन झाले आहे. न्यूमोनिया झाल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

मात्र काल दुपारी उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. शिवसेनामध्ये फूट पडल्यानंतर अनिल बाबर यांनी महाविकास आघाडीवर उघडपणे नाराजी व्यक्त करत एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला होता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे अनिल बाबर विश्वासू आमदार होते.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे ट्वीट अनिल बाबर यांच्या निधनानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही ट्वीट करत शोक व्यक्त केला आहे.” खानापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार अनिल बाबर यांचे दुःखद निधन झाले आहे.

त्यांच्या निधनाने आपण खऱ्या अर्थाने शिवसेनेचा समाजकार्याचा वसा चालवणारा एक अतिशय प्रभावी असा लोकप्रतिनिधी गमावला आहे. त्यांच्यावर शासकीय ईतमामात अंत्यसंस्कार करण्याच्या सूचनाही प्रशासनाला दिल्या आहेत”

खानापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार अनिल बाबर यांचे दुःखद निधन झाले आहे. त्यांच्या निधनाने आपण खऱ्या अर्थाने शिवसेनेचा समाजकार्याचा वसा चालवणारा एक अतिशय प्रभावी असा लोकप्रतिनिधी गमावला आहे. त्यांच्यावर शासकीय ईतमामात अंत्यसंस्कार करण्याच्या सूचनाही प्रशासनाला दिल्या आहेत

पुढे त्यांनी लिहिले, “आपल्या खानापूर आटपाडी मतदारसंघांमध्ये त्यांनी शिवसेनेचे केलेले कार्य कधीही न विसरण्याजोगे आहे. बेघरांना घरे मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणे किंवा रक्तदान शिबिरांचे आयोजन, कृष्णा खोऱ्यातील पाणी आणि टेंभू योजना कार्यान्वित व्हावी म्हणून केलेले प्रयत्न असो किंवा शिक्षण संस्थांच्या माध्यमातून शिक्षणाचा तळागाळापर्यंत केलेला प्रसार असो,

अनिल बाबर यांनी एक आदर्श लोकप्रतिनिधी म्हणून काम केले.” “खानापूर आटपाडी भागामध्ये शेतकऱ्यांच्या समस्यांसाठी अनिल बाबर हे कायम एका लढाऊ वृत्तीने लढले. त्यांनी या भागातील शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी अथक प्रयत्न केले. त्यांच्या निधनाने शिवसेनेचा एक ज्येष्ठ लोकप्रतिनिधी, माझा जवळचा सहकारी आणि मार्गदर्शक आम्ही गमावला आहे.

परमेश्वर त्यांच्या आत्म्यास सद्गती प्रदान करो तसेच बाबर कुटुंबातील सदस्यांना या दुःखातून सावरण्याकरता बळ देवो हीच प्रार्थना. भावपूर्ण श्रद्धांजली,” असे  ट्वीट एकनाथ  शिंदे यांनी केले आहे.

कोण आहेत अनिल बाबर?  शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या बाबर यांनी वयाच्या 19 व्या वर्षी राजकारणात पाऊल ठेवलं होतं. खानापूर तालुक्यातील गर्दी गावाचे सरपंच म्हणून ते निवडून आले होते. बाबर यांची पाणीदार आमदार म्हणून ओळख होती.

2019 मध्ये अनिल बाबर हे शिवसेनेच्या चिन्हावर निवडून आले होते. त्यांनी अपक्ष उभा राहिलेल्या सदाशिव पाटील यांचा पराभव केला होता. 1990, 1999, 2014, 2019 असे चार वेळा ते आमदार राहिलेत.

टेंभू योजना पूर्णत्वाकडे नेण्यात त्याचा मोलाचा वाटा मानला जातो. दरम्यान, गेल्यावर्षी अनिल बाबर यांच्या पत्नी शोभा बाबर यांचं निधन झाले होते. सहा महिन्यानंतर अनिल बाबर यांचेही निधन झाल्याने शोककळा पसरली आहे.

Leave a Comment