पुण्यातील भवानी पेठ, टिंबर मार्केट येथील लाकूड सामान असलेल्या गोडाऊनला भीषण आग लागली आहे. ही दुर्घटना आज सकाळी पहाटे 4 वाजण्याच्या सुमारास घडली.
गोदामाला लागलेली आग एवढी भीषण होती कि, आगीचे आणि धुराचे लोट दूरवरुन दिसत होते. अग्निशामक दलाचे तब्बल ३० बंब घटनास्थळी पोहचले असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम सुरू आहे.
ही दुर्घटना लक्षात घेता मुख्य अग्निशमन अधिकारी देवेंद्र पोटफोडे यांच्यासमवेत इतर २० अधिकारी आणि जवळपास १०० जवान, पुणे मनपा- पुणे कॅन्टोमेंट-पीएमआरडीए-पिंपरी चिंचवड अग्निशमन दल अशी एकुण जवळपास ३० अग्निशमन वाहने आणि खाजगी वॉटर टँकर दाखल झाले असून सध्या आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत.
या आगीत मोठं नुकसान झालं असून आगीचं नेमकं कारण समजू शकलेलं नाही. दरम्यान, आगीची झळ शेजारील चार घरांना बसली आहे. जवानांनी प्रथमतः आग वस्तीमधे आणि शेजारील शाळेमध्ये पसरु न दिल्याने व सुमारे १० सिलेंडर बाहेर काढल्याने मोठा अनर्थ टळला. सुदैवाने या घटनेमध्ये कोणतीही जिवितहानी झाली नाही.