बिल्डरच्या बंगल्यातून ७९ लाखांचा मौल्यवान ऐवज चोरी

Photo of author

By Sandhya

बिल्डरच्या बंगल्यातून ७९ लाखांचा मौल्यवान ऐवज चोरी

पुणे : शहरातील एका बिल्डरच्या बंगल्यातून सुरक्षा रक्षकानेच ७९ लाख रूपयांचा मौल्यवान ऐवज चोरी केल्याची घटना समोर आली आहे. ही घटना सेनापती बापट रस्त्यावरील मंगलवाडी सोसायटीमध्ये शनिवारी रात्री घडली.

प्रीतम राजेंद्र मंडलेचा (वय ३५, रा. राजव्हिला बंगलो, सेनापती बापट रस्ता) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार चतुःश्रृंगी पोलिसांनी सुरक्षा रक्षक झंकार बहादूर सौद (मूळ रा. नेपाळ) आणि त्याच्या दोन साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बिल्डर मंडलेचा हे शनिवारी रात्री आठ ते १० वाजण्याच्या दरम्यान कामानिमित्त बाहेर गेले होते. ही संधी साधत सुरक्षा रक्षक झंकार सौद आणि त्याच्या दोन साथीदारांनी मंडलेचा यांच्या बंगल्याच्या दरवाजाचे लॅच तोडून आत प्रवेश केला. चोरट्यांनी बंगल्यातून १० लाख ५० हजारांची रोकड, १० लाखांची सोन्याची बिस्किटे, २४ लाखांचे दोन कुंदनहार, पाच सोन्याच्या अंगठ्या, सोनसाखळ्या, सोन्याचे कडे, ब्रेसलेट, सोन्याच्या बांगड्या, डायमंड मंगळसूत्र, निळा पाचू, नेकलेस असा एकूण ७८ लाख ९३ हजार रुपयांचा ऐवज चोरी केला.

या संदर्भात माहिती मिळाल्यानंतर पोलिस उपायुक्त शशिकांत बोराटे, सहायक आयुक्त आरती बनसोडे, गुन्हे शाखेचे सहायक आयुक्त सुनील पवार, वरिष्ठ पोलिस निरीक्षक बालाजी पांढरे, पोलिस निरीक्षक अंकुश चिंतामण यांनी घटनास्थळी भेट दिली. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक रूपेश चाळके करीत आहेत.

आरोपी झंकार सौद हा दोन महिन्यांपूर्वी एजन्सीमार्फत बिल्डर मंडलेचा यांच्या बंगल्यावर सुरक्षा रक्षक म्हणून कामास लागला होता. तो बंगल्याच्या आवारातच राहत होता. त्याने आपण मोबाईल वापरत नसल्याचे त्यांना सांगितले होते. दरम्यान, पोलिसांचे एक पथक नेपाळ बॉर्डरकडे पाठविण्यात आले आहे, असे वरिष्ठ पोलिस निरीक्षक बालाजी पांढरे यांनी सांगितले.

Leave a Comment