BJP : भाजपाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी कोण विराजमान होणार? ‘ही’ चार नावं चर्चेत, ६ एप्रिलला होणार घोषणा?

Photo of author

By Sandhya

BJP : भाजपाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची माळ कुणाच्या गळ्यात पडणार? याची सध्या प्रचंड चर्चा सुरु आहे. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांना मंत्रिमंडळात स्थान देण्यात आलं आहे. त्याचप्रमाणे नड्डा यांचा कार्यकाळही संपला आहे. त्यामुळे नवीन अध्यक्ष कोण? यासाठी चार नावांची चर्चा होते आहे. याबाबत आपण जाणून घेऊ.

अमित शाह यांच्यानंतर जे.पी. नड्डा अध्यक्ष

२०१४ मध्ये देशात भाजपाची सत्ता आल्यानंतर राष्ट्रीय अध्यक्षपदी अमित शाह विराजमान झाले होते. तर २०१९ मध्ये जे. पी. नड्डा हे भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष झाले. त्यांच्या कार्यकाळात महत्त्वाचे निर्णयही घेण्यात आले. आता त्यांचा कार्यकाळ संपला आहे. त्यामुळे भाजपातील चार महत्त्वाची नावं या पदासाठी चर्चेत आहेत. याच आठवड्यात म्हणजेच ६ एप्रिल रोजी भाजपाचा राष्ट्रीय अध्यक्ष निवडला जाईल अशी चिन्हं आहेत.
जे. पी. नड्डा यांचा कार्यकाळ कसा राहिला?

अमित शाह यांच्याकडून राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे हातात घेतल्यानंतर जे. पी. नड्डा यांना अनेक मोठ्या जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागल्या. नड्डा यांनी पक्षाध्यक्षपदाची धुरा स्वीकारल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्याबरोबर प्रभावी कार्यसंबंध प्रस्थापित केले. पक्षातील अंतर्गत सूत्राने सांगितले की, भाजपाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची धुरा सांभाळताना नड्डा यांनी आपली उपयुक्तता सिद्ध करून दाखवली. पक्षात त्यांना एक चांगला वक्ता म्हणून ओळख मिळाली. त्यांच्या प्रभावशाली भाषणांमुळे इतर राजकीय पक्षाच्या नेत्यांनी भाजपाची कास धरली आणि संपूर्ण देशभरात पक्षाला मोठी बळकटी मिळाली.
जे. पी. नड्डा यांचं ते वक्तव्य आणि वाद

६४ वर्षीय जे. पी. नड्डा यांनी भाजपाला लोकसभा आणि विधानसभा अशा २६ निवडणुकांमध्ये विजय मिळवून नवीन विक्रम प्रस्थापित केला. २०२३ च्या अखेरीस भाजपाने मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड राज्यांमधील सत्ता कायम ठेवली. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीदरम्यान इंडियन एक्स्प्रेसला दिलेल्या मुलाखतीत नड्डा यांनी भाजपा आता स्वयंपूर्ण असून पक्षाला पूर्वीप्रमाणे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची आवश्यकता नाही असं विधान केलं, ज्यामुळे भाजपा आणि आरएसएसमधील मतभेद उघड झाले आणि त्याचा परिणाम पक्षाच्या कामगिरीवर झाला. लोकसभा निवडणुकीत भाजपाच्या जागा ३०३ वरून २४२ पर्यंत घसरल्या. विरोधकांनी संविधान बचावचा नारा दिल्यानंतर मागसवर्गीय समुदायातील मतदारांनी भाजपाकडे पाठ फिरवली.

आता राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी चार नावं चर्चेत आहेत ती कुठली?

शिवराज सिंग चौहान, भुपेंद्र यादव , मनोहरलाल खट्टर आणि धर्मेंद्र प्रधान ही चार नावं भाजपाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी चर्चेत आहेत. ६ एप्रिलला भाजपाचा स्थापना दिवस आहे. त्यामुळे या दिवशी नाव जाहीर होण्याची शक्यता आहे.
फेब्रुवारी महिन्यात एका वरिष्ठ नेत्याने काय सांगितलं होतं?

उत्तर प्रदेशातल्या एका नेत्याचं म्हणणं आहे की जिल्हा पातळीवरच्या निवडणुका होणं बाकी आहेत. त्या राज्यात सुरु झाल्या की भाजपाच्या राष्ट्रीय अध्यक्ष निवडीच्या प्रक्रियेला वेग येईल. विविध कारणं समोर येत आहेत. मात्र भाजपाच्या राष्ट्रीय अध्यक्षांची निवड का लांबते आहे याचं ठोस कारण अद्याप समोर आलेलं नाही. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या आधी देवेंद्र फडणवीस यांच्याकडे राष्ट्रीय अध्यक्षपद दिलं जाईल अशाही चर्चा रंगल्या होत्या. मात्र देवेंद्र फडणवीस यांनी आपण महाराष्ट्रातच राहणार असं सांगितलं होतं. दरम्यान निवडणुकीत भाजपासह महायुतीला २३७ जागा मिळाल्यानंतर देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले आहेत. साधारण वर्षभरापूर्वी विनोद तावडेंचंही नाव चर्चेत होतं. दरम्यान आता नवे चार चेहरे चर्चेत आहेत. त्यापैकी कुणाला राष्ट्रीय अध्यक्षपद मिळणार की भाजपा धक्कातंत्राचा वापर करुन अनेपक्षित नाव समोरआणणार? हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.

Leave a Comment

You cannot copy content of this page