
सासवडमध्ये भाजपचा वर्धापनदिन उत्साहात; ‘राष्ट्र प्रथम’ विचाराने पक्ष पुढे नेण्याचा कार्यकर्त्यांचा निर्धार
“भारतीय जनता पक्ष ही केवळ एक राजकीय संघटना नसून ती एक भक्कम संस्थात्मक रचना आणि विशाल परिवार आहे. जगातील सर्वात मोठ्या राजकीय पक्षाचे कार्यकर्ते असल्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे,” अशा भावना भाजपचे प्रदेश सरचिटणीस व माजी आमदार संजय जगताप यांनी व्यक्त केल्या. सासवड (ता. पुरंदर) येथील भारतीय जनता पक्षाच्या मध्यवर्ती कार्यालयात सोमवारी (ता. ६) पक्षाचा वर्धापनदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी संजय जगताप यांच्या हस्ते पक्षध्वजाचे रोहण करण्यात आले. यावेळी ‘भारत माता की जय’ आणि ‘भारतीय जनता पक्ष विजय असो’ अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता. त्यानंतर पक्षाचे प्रेरणास्थान आणि संस्थापक डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी व पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या प्रतिमांचे पूजन करून त्यांना भावपूर्ण अभिवादन करण्यात आले.
याप्रसंगी मार्गदर्शन करताना जगताप यांनी पक्षाच्या गौरवशाली इतिहासाला उजाळा दिला. डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी आणि पंडित दीनदयाळ उपाध्याय यांनी पेरलेल्या विचारांपासून ते माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी आणि लालकृष्ण आडवाणी यांनी दिलेल्या खंबीर नेतृत्वापर्यंतचा प्रवास त्यांनी मांडला. “आज पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली देश आणि राज्य विकासाच्या नवनवीन शिखरांकडे जात आहे. हिंदुत्व, अखंड भारत आणि सर्वधर्म समभावाचा विचार घेऊनच हा पक्ष यशस्वी वाटचाल करत आहे,” असेही त्यांनी यावेळी नमूद केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा उपाध्यक्ष संभाजी काळाणे यांनी केले, तर आभार निरा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती संदीप फडतरे यांनी मानले.
यावेळी प्रमुख उपस्थिती:
या सोहळ्याला मंडल अध्यक्ष संजय निगडे, जिल्हा परिषद सदस्य हरीभाऊ लोळे, अजय इंगळे, पंचायत समिती सदस्या सायली मनोज शिंदे, उपनगराध्यक्ष मनोहर जगताप, गटनेते अजित जगताप, ज्ञानेश्वर जगताप, प्रदीप राऊत, तुषार माहूरकर, जयेंद्र निकम, साकेत जगताप, सुनील देशपांडे, सुनीता कोलते, मंजूषा गायकवाड, यशवंतकाका जगताप, देविदास कामथे, संतोष जगताप, संतोष खोपडे, संतोष गिरमे, विठ्ठल मोकाशी, संतोष सोनवणे, सागर घाटगे, विकास इंदलकर, माणिक चोरमले, भाऊसाहेब दळवी, सौरभ वढणे, चेतन महाजन, तुषार जगताप, अनिरुद्ध दोडके, मंदार टिळेकर यांसह विविध आघाड्यांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.