संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीचे आषाढी वारीसाठी दि. 11 जूनला प्रस्थान होणार आहे. या काळात भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी असते.
त्यामुळे वारकऱ्यांची आणि अत्यावश्यक सेवांची वाहने वगळता इतर वाहनांना बुधवार (दि. 7) ते सोमवार (दि. 12) पर्यंत आळंदीत प्रवेश बंदी करण्यात आली आहे, अशी माहिती आळंदीचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक सुनील गोडसे यांनी दिली.
माऊलींचा प्रस्थान सोहळा उत्सवासाठी राज्यासह परराज्यातून सुमारे 4 ते 5 लाख भाविक उपस्थित राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. तर, आळंदीतील जे कर्मचारी कामानिमित्त आळंदीच्या बाहेर जातात त्यांना पासची व्यवस्था करण्यात आली आहे.
पाससाठी अर्ज करताना सोबत आळंदीत राहत असल्याचा पुरावा, ज्या कंपनीत काम करत आहे तेथील ओळखपत्र आवश्यक आहे. तसेच विद्यार्थ्यांना कॉलेजचे ओळखपत्र दाखवणे आवश्यक आहे. 6 जूनपासून पास देण्यात येणार आहेत.