शहापूरच्या सरळांबे गावाजवळ समृद्धी महामार्गाच्या निर्माणाधीन पुलाचा गर्डर कोसळल्याची घटना घडली. सोमवारी (दि. ३१) मध्यरात्रीनंतर झालेल्या भीषण दुर्घटनेत मृतांचा आकडा वाढला आहे.
या दुर्घटनेत १७ कामगार ठार झाल्याची अद्ययावत माहिती आहे. तर एएनआयच्या माहितीनुसार आतापर्यंत १६ जणांचा मृत्यू झाला आहे. शोधकार्य सुरू अजूनही सुरू असून या दुर्घटनेतील मृतांची संख्या वाढण्याची शक्यता प्रशासनाकडून वर्तविली जात आहे.
समृद्धी महामार्गावर शहापूर (जि. ठाणे) तालुक्यातील सरळांबे येथे पुलाचे काम सुरू आहे. या पुलाचे काम सुरू असतानाच अचानक त्यावरील ग्रेडर आणि मशिन खाली कोसळून मोठी दुर्घटना घडली. सोमवारी मध्यरात्री घडलेल्या या घटनेत १४ कामगार ठार झाल्याचे प्राथमिक वृत्त होते.
तसेच आणखी २०-२५ जणांचा मृत्यू झाल्याची शक्यता प्रशासनाकडून वर्तविली जात आहे. मध्यरात्रीपर्यंत चौदा कामगारांचे मृतदेह शहापूरच्या उपजिल्हा रुग्णालयात पोहोचले होते.
शहापूरचे मुख्य वैद्यकीय अधिकारी राहुल जाधव यांनी दिलेल्या माहितीनुसार, समृद्धी महामार्गावर झालेल्या दुर्घटनेत मृत आणि जखमींची संख्या वाढण्याची शक्यता आहे.
पावसाने उघडीप दिल्याने या पुलाचे काम रात्री देखील सुरू होते. साडेबाराच्या सुमारास अचानक गर्डर खाली आला आणि त्याखाली कामगार सापडले.