Budget session of Maharashtra State Legislature begins today
राज्याचा अर्थसंकल्प ६ मार्चला मुख्यामंत्री फडणवीस मांडणार



महाराष्ट्र राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून सुरुवात होत असून, हे अधिवेशन २५ मार्चपर्यंत चालणार आहे. विशेष म्हणजे, यंदा राज्याचा अर्थसंकल्प ६ मार्च रोजी सादर केला जाणार असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतः हा अर्थसंकल्प मांडणार आहेत.
अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी राज्यपालांच्या अभिभाषणानंतर, ज्येष्ठ नेते अजित पवार यांच्या निधनाबद्दल शोकप्रस्ताव मांडण्यात येईल. त्यांच्या विमान अपघाताचा गंभीर विषय आमदार रोहित पवार विधानसभेत उपस्थित करण्याची शक्यता आहे. आजचा संपूर्ण दिवस शोकप्रस्तावावरील चर्चेसाठी राखीव ठेवण्यात आला असून, प्रत्यक्ष कामकाजाला मंगळवारपासून सुरुवात होईल.
कांदा, धान, सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या समस्यांवरून सभागृह गाजण्याची चिन्हे आहेत.तसेच मुंबई महापालिका निवडणुकीतील अडवणूक आणि अलिबागमधील जमीन मोजणीच्या प्रकरणावरून विरोधक विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना लक्ष्य करण्याची शक्यता आहे.पुणे घाट आणि मुलुंड येथे झालेल्या भीषण अपघातांच्या पार्श्वभूमीवर सरकारला जाब विचारला जाईल.
या अधिवेशनातही अद्याप विरोधी पक्षनेता नसल्याने कामकाजावर त्याचा काय परिणाम होतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.शेतकऱ्यांचे प्रश्न आणि अलीकडील अपघातांच्या घटनांमुळे हे अधिवेशन वादळी ठरण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.