महागाई कशी वाढत चालली आहे, ती सतत तुमच्या डोक्यात रहावी, म्हणून मी तुमच्या लक्षात आणून देत आहे. बटन दाबताना ही महागाई लक्षात राहिली पाहिजे, अशा मिश्किल शब्दांत विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी वाढत्या महागाईवरून सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला.
बारामती येथे आज (दि.२१) ज्येष्ठ नागरिक निवास येथील वाढीव भोजन कक्ष व करमणूक कक्ष इमारतीचे उद्घाटन पवार यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते.
पवार म्हणाले की, येथील एका कक्षाचे बांधकाम ५० हजारात पूर्वी झाले होते. मात्र त्याच्या नुतनीकरणासाठी ३ लाख रूपये खर्च आला. महागाई कशी वाढत चालली आहे. हे तुमच्या लक्षात रहावे, यासाठी मी सांगतो आहे.
देशासमोर महागाई, बेरोजगारीचे प्रश्न आहेत, असेही पवार म्हणाले. दरम्यान, देशाची लोकसंख्या वाढली आहे. चीनला देखील लोकसंख्येच्या बाबतीत आपण मागे टाकले आहे.
तरूणांची संख्या मोठी आहे. त्यामध्ये लोकसंख्येच्या प्रमाणात ज्येष्ठांची संख्या देखील वाढली आहे. घरामध्ये एकट्या राहणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना काही ‘मेडीकल इमरजेन्सी’ आली तर अशा वेळी ज्येष्ठ नागरिक निवारा केंद्र उपयुक्त आहे, असेही पवार यांनी सांगितले