
नवी दिल्ली : मणिपूरचे मुख्यमंत्री एन बिरेन सिंह यांनी राजीनामा दिला आहे. त्यानंतर केंद्र सरकारनं मणिपूरमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्याची घोषणा केली. मणिपूरचे राज्यपाल अजय कुमार भल्ला आणि निमलष्करी दलाच्या अधिकाऱ्यांची राजभवनात बैठक झाली. अधिकाऱ्यांनी केंद्रीय राखीव पोलीस दलाची (CRPF) तैनाती आणि ऑपरेशनल कारवाईंची यावेळी माहिती दिली. मणिपूर विधानसभेत काँग्रेसकडून अविश्वास प्रस्ताव आणण्याची तयारी सुरू होती. त्यातच सरकारनं राष्ट्रपती राजवट लागू केली आहे.
मुख्यमंत्री बिरेन सिंह यांचा राजीनामा : मणिपूरचे मुख्यमंत्री एन बिरेन सिंह यांनी रविवारी 9 फेब्रुवारीला आपल्या पदाचा राजीनामा दिला. एन बिरेन सिंह यांनी मणिपूरचे राज्यपाल अजय कुमार भल्ला यांच्याकडं आपला राजीनामा सुपूर्द केला. राज्यपालांनी मुख्यमंत्री एन बिरेन सिंह यांचा राजीनामा स्वीकारला. आपल्या राजीनाम्यात एन बिरेन सिंह यांनी आपल्या राजीनाम्यात “मणिपूरच्या नागरिकांची सेवा करणं ही माझ्यासाठी सन्मानाची गोष्ट आहे. मणिपुरी नागरिकांच्या हिताचं रक्षण करण्यासाठी विकास कार्ये आणि विविध प्रकल्पांच्या अंमलबजावणीसाठी मी केंद्र सरकारचा आभारी आहे. केंद्र सरकारनं त्यांचं कार्य असच चालू ठेवावं. सीमेवरील घुसखोरीवर कारवाई सुरू ठेववी. बेकायदा स्थलांतरितांच्या हद्दपारीसाठी धोरण तयार करावं,” अशी विनंती केली.
मणिपूरमध्ये तब्बल 200 पेक्षा जास्त नागरिकांचा बळी : मणिपूरमध्ये झालेल्या हिंसाचारात तब्बल 200 पेक्षा अधिक नागरिकांचा बळी गेला आहे. या हिंसाचारामुळे हजारो नागरिक विस्थापित झाले. मणिपूर राज्यात मे 2023 पासून मेईतेई आणि कुकी या दोन जातीत संघर्ष सुरू आहे. मणिपूरमध्ये भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखालील सरकार होतं. मात्र पक्षांतर्गत सुरु असलेला विरोध एन बिरेन सिंह यांच्या पथ्यावर पडला. बंडाळीची शक्यता निर्माण झाल्यानं एन बिरेन सिंह यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेत आपला राजीनामा दिला.