रामटेक लोकसभा मतदारसंघ गेल्या अनेक वर्षांपासून शिवसेनेकडे आहे. सध्या देखील रामटेक शिवसेनेकडेच आहे. त्यावर लवकरच निर्णय होईल, अमरावतीत भाजपच लढेल असे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज स्पष्ट केल्याने भाजपने रामटेकवरील दावा सोडला का, अशी चर्चा सुरू झाली आहे.
विद्यमान शिवसेना खासदार कृपाल तुमाने यांच्या तिकिटावरून शिंदे गट आणि बाहेरच्या उमेदवाराला तिकीट नको म्हणून आक्रमक झालेले भाजपचे कार्यकर्ते या पार्श्वभूमीवर सुरू असलेला पेच आज संपण्याची चिन्हे आहेत.
यासंदर्भात बावनकुळे म्हणाले, आज आमची सीईसी बैठक आहे, ज्या 5 जागा भाजपकडे आहेत त्यावर आज चर्चा होईल. संजय राऊत रोज बेताल बोलत आहेत. जनता धडा शिकवेल, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर ते जहरी टीका करत आहेत.
त्यांना जनताच त्यांची जागा मतातून दाखवेल. राज्यात 6 ते 7 जागांवर पेच आहे, त्यावर लवकर निर्णय होईल. आम्ही इलेक्शन कॅम्पेन बूथ लेव्हलवर लढतोय, 10 वर्षातील सरकारच्या योजना, मोदींचा नमस्कार घरोघरी पोहचवतोय.
काही मतभेद होत असतात, बच्चू कडू किंवा अडसूळ यांचे मतभेद झाले असतील मात्र देशात मोदी प्रधानमंत्री व्हावे यासाठी बच्चू कडू, अडसूळ सगळे प्रयत्न करतील, बच्चू कडू सोबत राहतील असा दावा बावनकुळे यांनी केला.
दरम्यान, उदयन राजे यांची साताऱ्याची मागणी आहे, त्यावर महायुतीचे नेते निर्णय घेतील. अमरावती ही जागा भाजपकडे आहे. 100 टक्के भाजपच्या चिन्हावर लढून जिंकण्याकरिता आवश्यक बाबी आहेत.
त्यावर उमेदवार निश्चित करण्यात येत आहे. दक्षिण मुंबई बाबत शिंदे निर्णय घेतील. आढळराव पाटील यांचं काही ठरले असेल म्हणून ते राष्ट्रवादीत प्रवेश करत असतील. संभाजीनगर बाबत तिढा नाही, चर्चा सुरू आहे. प्रतिष्ठेप्रमाणे सर्वांना तिकीट दिले जाईल, सर्वांचा सन्मान ठेवण्यात येईल. मनसे किंवा इतरांमुळे उमेदवार जाहीर करण्यास वेळ होत नाही.