मराठा आरक्षणावरून ओबीसी नेते छगन भुजबळ आणि मनोज जरांगे पाटील यांच्यातील वाद अजून कमी झालेला नाहीये. दोन्ही नेते एकमेकांविरोधात टोकाचे वक्तव्य करत असतात.
आरक्षण मिळवण्यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी विधानसभेच्या रिंगणात उतरण्याचा निर्धार केलाय. आता छगन भुजबळ यांनी त्यावरून मनोज जरांगे यांना टोला लगावलाय. त्याचबरोबर त्यांनी जरांगेंना एक विनंती केलीय.
मराठा समाजाला आरक्षणात मंत्री छगन भुजबळ आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आडकाठी आणत असल्याचा आरोप जरांगे नेहमी करतात. आरक्षण मिळालं नाहीतर आपण निवडणुकीच्या आखाड्यात उतरणार असल्याचं म्हणत त्यांनी दंड थोपटलेत.
मराठा समाजाला ओबीसी प्रर्वगातून आरक्षण देण्याबाबत सरकार सकारात्मक नसेल तर आपण विधानसभेत २८८ जागांवर उमेदवार उभे करणार असल्याचं जरांगे पाटील म्हणालेत. त्यापार्श्वभूमीवर जरांगे -पाटील यांनी आढावा घेण्यास सुरुवात केलीय.
आता त्यांनी शांतता जनजागृती रॅली सुरू केली असून ते आता राज्याच्या दौऱ्यावर आहेत. भाजपचे उमेदवार ज्या ठिकाणी निवडणुकीसाठी उभे असतील किंवा छगन भुजबळ हे जेथे प्रचार करायला जातील तेथील उमेदवाराला पाडा असं आवाहन ते मराठा समाजाला या रॅलीदरम्यान करत आहेत.
दरम्यान जरांगे यांच्या निवडणूक लढवण्याच्या निर्णयावरून ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी त्यांना टोला लगावलाय. लोकशाही आहे, निवडणूक लढण्याचा अधिकार आहे. जरांगेंनी २८८ उमेदवार उभे करावेत, उमेदवार दिलेल्या जागांमधून त्यांचे फक्त ७-८ जागा निवडून आले तरी बस झालं, अशी कोपरखळी भुजबळांनी जरांगेंना मारलीय.
त्याचबरोबर त्यांनी जरांगे-पाटील यांच्याकडे एक विनंती केलीय. मनोज जरांगे यांनी २८८ उमेदवार देतांना ज्या जागांमध्ये दलित समाजासाठी राखीव जागा आहेत, तिथे उमेदवार उभे करू नये.
आदिवासींसाठी जागा आहेत, तिथे उमेदवार देऊ नये, असा विनंती भुजबळांनी केलीय. माझा माझ्या येवला लासलगाव मतदारसंघावर पूर्ण विश्वास आहे. तेथे विकास हा मुद्दा आहे. मी दिलेली कामं केली असल्याचं भुजबळ यांनी आपल्या येवला मतदारसंघाबाबत म्हणाले.
ज्याला आरक्षण कुणासाठी कशासाठी याची ज्याला कल्पना आहे त्याच्यासोबत बसायला काही हरकत नाही. पण जर कोणी आडमुठेपणाने मागत असेल तर कसं होणार असा इशाराही भुजबळ यांनी यावेळी दिलाय. इतर कोणालाही धक्का न लावता आरक्षण द्यावं अशी भूमिका आहे. सगळ्या प्रमुख पक्षांची तीच भूमिका आहे.
मात्र त्यांची मागणी ओबीसीमधून आरक्षण मिळालं पाहिजे, अशी आहे. तसेच आरक्षणासंदर्भात जरांगेंशी चर्चा करण्यात कोणताच अर्थ नसल्याचं भुजबळ म्हणालेत. समाजा-समाजामध्ये वाद सुरू झालेत. हे कोणालाही आवडणारे नाहीये.