छगन भुजबळ : ‘मराठा’प्रश्नी काढलेला मसुदा रद्द करा…

Photo of author

By Sandhya

छगन भुजबळ

मराठा समाजाचा पडद्याआडून ओबीसीमध्ये समावेश करण्याच्या निषेधार्थ 1 फेब्रुवारी रोजी महाराष्ट्रातील आमदार, खासदार आणि तहसीलदारांच्या घरांवर निदर्शने, तर 3 फेब्रुवारी रोजी अहमदनगरमध्ये ओबीसींची सभा आयोजित करण्यात आली आहे.

राज्याचे अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांच्या ‘सिद्धगड’ या शासकीय निवासस्थानी रविवारी आयोजित ओबीसी नेत्यांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

संपूर्ण महाराष्ट्रात ओबीसी एल्गार यात्रा काढण्याचा निर्णयही यावेळी घेण्यात आला. मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी काढलेला मसुदा रद्द करण्यात यावा, असा ठरावही यावेळी करण्यात आला.

सरकारने 26 जानेवारी रोजी मनोज जरांगे यांच्याकडे सोपविलेल्या अध्यादेशाच्या मसुद्यामध्ये मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे ओबीसी समाजामध्ये भीतीचे वातावरण आहे.

ओबीसी, भटक्या-विमुक्त लेकरांचा तोंडचा घास काढून घेतला आहे. बहुसंख्य ओबीसी घटकावर आम्ही अन्याय होऊ देणार नाही. त्यासाठी वाटेल ती किंमत मोजू, असा निर्धार भुजबळ यांनी या बैठकीत व्यक्त केला.

या बैठकीला माजी मंत्री राम शिंदे, आमदार गोपीचंद पडळकर यांच्यासह माजी आमदार नारायण मुंडे, पंकज भुजबळ, आगरी समाजाचे राजाराम पाटील, मुस्लिम ओबीसी नेते शब्बीर अन्सारी, माजी सनदी अधिकारी महेश झगडे, मागासवर्गीय आयोगाचे माजी सदस्य लक्ष्मण हाके, कुणबी सेनेचे विश्वनाथ पाटील, दौलतराव शितोळे, सत्संग मुंडे, कल्याण दळे आदी नेते उपस्थित होते.

भुजबळ म्हणाले, सध्या सरकारकडून ओबीसी समाजाला फसविण्याचे काम सुरू आहे. सगेसोयरे याची स्पष्ट व्याख्या असताना त्यात बेकायदेशीर बदल केले जात आहेत. ओबीसी समाजामध्ये मराठा समाजाला घेऊन ओबीसींना आरक्षणाच्या बाहेरच ढकलण्याचे काम सुरू आहे. मराठा समाजाला वेगळे आरक्षण देण्यास आमचा कुठलाही विरोध नव्हता;

पण आमच्या भटक्या, विमुक्त, ओबीसी बांधवांच्या लेकरांचा घास काढून घेतला जात असल्याबद्दल आम्हाला दुःख आहे. ओबीसींना 27 टक्के आरक्षण जाहीर झाले असले, तरी अद्याप ते पूर्ण मिळालेले नाही.

राज्यात 9.5 टक्केच आरक्षण आहे. मराठा समाजाला जास्त सरकारी नोकर्‍या मिळाल्या आहेत. ईडब्ल्यूएस आरक्षणात 95 टक्के जागा मराठा समाजाला मिळाल्या आहेत, खुल्या प्रवर्गातील 40 टक्क्यांतही मराठा समाज पुढे गेलेला आहे. त्यात कुणबी मराठाही आहेत.

ओबीसी आरक्षणाला धक्का लावणार नाही, असे बोलले जात असले, तरी दुसरीकडे ओबीसी वाटेकर्‍यात मोठ्या प्रमाणात मराठा समाज घुसवण्याचे काम मागील दाराने जोरात सुरू असल्याचे भुजबळ म्हणाले.

माजी मंत्री राम शिंदे यांनी राज्यात ओबीसी अडचणीत आल्यामुळे भुजबळ यांना ताकद देण्याची वेळ आली असल्याची भावना व्यक्त केली. आपले अंतर्गत वाद बाजूला ठेवून लढले पाहिजे. आमदार गोपीचंद पडळकर म्हणाले, ओबीसी समाजावर मोठे संकट आले आहे. त्यामुळे भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली मोठी चळवळ उभी करणे आवश्यक आहे.

Leave a Comment