चाकण | उड्डाणपुलांमुळे प्रवाशांची होणारी तासनतास कोंडी, नव्या पुलाची आवश्यकता

Photo of author

By Sandhya

नवीन पूल बांधण्यासाठी आमरण उपोषणाचा इशारा,.

पुणे – नाशिक व चाकण – तळेगाव महामार्गावर वारंवार होणाऱ्या नित्याच्या वाहतूक कोंडीमुळे या रस्त्यावर प्रवास करणारे प्रवासी, वाहन चालक, ज्येष्ठ नागरिक अक्षरशः वैतागले आहेत. चाकणमधील दोन्ही उड्डाणपूल असून अडचण नसून खोळंबा अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. चुकीच्या ठिकाणी बांधण्यात आलेल्या उड्डाणपुलामुळे चाकण मधील वाहतूक कोंडीचा अक्षरशा बट्ट्याबोळ झाला आहे. येथील दोन्ही उड्डाणपूल भुईसपाट करून नव्याने पूल बांधण्यासाठी आमरण उपोषण करण्याचा इशारा येथील उद्योजक बाळासाहेब उर्फ ज्ञानेश्वर शिळवणे यांनी दिला आहे.
पुणे – नाशिक आणि तळेगाव – शिक्रापूर शहरांना जोडणारे मुख्य महामार्ग असलेल्या महामार्गांमुळे हजारो गावे, शहरे एकमेकांना जोडली गेली आहेत. नागरिक, विद्यार्थी, महिला यांचा प्रवास सुखकर व्हावा म्हणून हे दोन्ही महामार्ग महत्त्वाचे आहेत. मात्र गेल्या अनेक वर्षांपासून या महामार्गाला वाहतूक कोंडीचे ग्रहण लागले आहे. या मार्गावरील आंतर राष्ट्रीय दर्जाची औद्योगिक वसाहत असल्याने असंख्य अवजड वाहनांची संख्या मोठी आहे.

पुणे नाशिक महामार्गावर मुख्य करून चिंबळी फाटा, मोई फाटा, कुरुळी फाटा, स्पाईसर चौक, आळंदी फाटा आणि चाकणमधील तळेगाव – आंबेठाण चौक या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असून वाहनांना तासन – तास महामार्गावर उभे राहावे लागत आहेत. या महामार्गावरील वाहतूक कोंडी दूर केली जात नसल्याने नागरिक त्रस्त आहेत. गेल्या अनेक वर्षात पुणे नाशिक महामार्गावर झालेली वाहतूक कोंडी आता नित्याची झाली आहे. ही मोठी शोकांतिका आहे.
उत्तर पुणे जिल्ह्यातील आंबेगाव, खेड व जुन्नर या तीन तालुक्यातील अनेक तरुण, नागरिक व महिला कामानिमित्त, शिक्षणासाठी पुणे येथे जात असतात. मंचर येथुन पुणे येथे जाण्यासाठी साधारणपणे दोन ते तीन तास लागतात. मात्र, वाहतूक कोंडी वाढल्याने आता चार ते पाच तास लागत आहेत. चाकण येथे तासन – तास वाहतूक कोंडीत वाहने उभी करावी लागत आहे. सध्याची परिस्थिती खुपच गंभीर आहे.

” चाकण मध्ये महामार्गावर बांधण्यात आलेले दोन्ही उड्डाणपूल चुकीच्या ठिकाणी बांधण्यात आले आहेत. नित्याच्या वाहतूक कोंडीने प्रवाशी रडकुंडीला आले आहेत. मुटकेवाडी ते स्वप्ननगरी या दरम्यान नव्याने उड्डाणपूल बांधणे आवश्यक असून, रस्त्याचे रुंदीकरण होणे तितकेच अपेक्षित आहे. हे दोन्ही उड्डाणपूल तातडीने भुईसपाट करून नव्याने पूल बांधावेत अन्यथा आमरण उपोषण करण्यात येईल.


Leave a Comment