चाकण :
कंटेनर, ट्रक आणि टेम्पो या तीन वाहनांचा चाकण – शिक्रापूर रस्त्यावर शेलपिंपळगाव लगत विचित्र अपघात झाला. या अपघातात टेम्पोमध्ये गंभीर जखमी दोन जण अडकले होते. चाकण एमआयडीसीच्या अग्निशामक विभागाच्या अथक प्रयत्नानंतर टेम्पोत अडकलेल्या दोन जणांची सुखरूप सुटका करण्यात आली.
या अपघातात अन्यही काही जखमी असल्याची माहिती प्रत्यक्षदर्शी नागरिकांनी दिली असून संबंधित जखमींना शिक्रापूर ( ता. शिरूर ) येथील रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले आहे. विशाल श्रीराम काळदाते (वय २५) आणि वैभव राजेंद्र काळदाते (वय २६, दोघेही रा. चिंचोली, जामखेड) अशी वाहनांत अडकून पडलेल्या जखमींची नावे आहेत. चाकण – शिक्रापूर रस्त्यावर बहुळ ( ता. खेड ) गावच्या हद्दीत कंटेनर आणि कडबा कुट्टी वाहतूक करणाऱ्या दोन वेगवेगळ्या वाहनांचा भीषण अपघात झाला. या अपघातात चार जण गंभीर जखमी झाले आहेत. अपघातानंतर दोन जण जखमी वाहनांमध्ये अडकून पडले. प्रयत्नांची पराकाष्ठा करत अग्निशमन दलाच्या मदतीने त्यांना या अपघातग्रस्त वाहनांमधून बाहेर काढण्यात आले. सर्व जखमींना शिक्रापूर येथील रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आले. यातील काहींचे पाय गेल्याचे प्रत्यक्षदर्शी नागरिकांनी सांगितले आहे. सर्व जखमींवर अतिदक्षता विभागात उपचार सुरु आहेत. या अपघातानंतर चाकण – शिक्रापूर रस्त्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.
चाकण एमआयडीसीच्या अग्निशामक विभागाने दिलेल्या माहितीनुसार, चाकण – शिक्रापूर रस्त्यावर बहुळ येथे कंटेनर, ट्रक आणि टेम्पो यांचा अपघात झाला होता. आतील एका वाहनात दोघेजण अडकले असल्याची माहिती चाकण पोलीस ठाण्यातील पोलीस नाईक यांच्याकडून अग्निशमन दलाला देण्यात आली. घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाचे बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले. टेम्पोत अडकलेल्या दोघांना बाहेर काढणे शक्य नसल्याने हायड्रोलिक कटर व इतर साहित्यांचा वापर करण्यात आला. तब्बल एक तासांच्या अथक प्रयत्नानंतर टेम्पोतील दोन जखमींना बाहेर काढण्यात यश आले. चाकण एमआयडीसीच्या अग्निशामक दलाच्या पथकाच्या मदतीने जखमींना बाहेर काढणे शक्य झाले.