मंचर ता. आंबेगाव येथील पत्रकार सचिन तोडकर व त्याचे कुटुंबीय भीमाशंकर येथे दर्शनासाठी जात असताना पोखरी गावच्या हद्दीत चार चाकी कारने बुधवार दि.३१ रोजी दुपारी अचानक पेट घेतला.
पत्रकार तोडकर यांचे बंधू हनुमंत तोडकर हे पाठीमागे दुसऱ्या गाडीत असल्याने त्यांनी पत्रकार तोडकर यांना गाडी पेटल्याची फोन फोनद्वारे माहिती दिली असता पत्रकार तोडकर यांनी तात्काळ गाडी थांबवून ते कुटुंबियासह बाहेर उतरले आणि त्यानंतर गाडी आगीच्या ज्वालात सापडली.
याबाबत सविस्तर माहिती अशी की पत्रकार सचिन तोडकर व त्याचे कुटुंबीयांनी भीमाशंकर येथे जाण्याचा प्लॅन केला होता. घरातीलच दोन गाड्यांमध्ये ते व त्यांचा भाऊ भीमाशंकर या ठिकाणी निघाले होते.
सचिन तोडकर यांच्याकडे त्यांची डस्टर गाडी एम एच ४३ ए एन ६९८६ हि गाडी होती तर भावाकडे दुसरी चारचाकी गाडी होती. हुतात्मा बाबू गेनू जलाशय डिभे धरणावर फिरून ते भीमाशंकर येथे जाण्यासाठी निघाले असता पोखरी गावचे हद्दीत दुपारी ३:३० च्या दरम्यान सचिन तोडकर यांच्या गाडीच्या मागील पुढील बाजूतून अचानक धूर व जाळ निघू लागला.
सचिन तोडकर गाडी चालवत असल्याने त्यांच्या हि बाब लक्षात आली नाही .मात्र त्यांच्याच गाडीच्या पाठीमागे असलेला त्यांचा भाऊ हनुमंत तोडकर यांना जाळ व धूर येत असल्याचे दिसले .त्याने याबाबत फोन करून सचिन तोडकर यांना माहिती दिली.
सचिन तोडकर यांनी प्रसंगावधान दाखवत तात्काळ गाडी रत्यावर थांबवली व गाडीत असलेली त्यांची पत्नी, मुलगा, भाचा, दोन लहान मुली यांना गाडीच्या बाहेर काढले. तोपर्यंत गाडीतील पुढील भागाला आग लागली होती.
गाडीतील पाणी व जार याने आग विझवण्याचा प्रयत्न केला असता ती वीझली नाही. तेथूनच जवळ असलेल्या हॉटेल ज्ञानेश्वर चे मालक ज्ञानेश्वर सोळसे यांनी पाण्याचा टँकर आणून आग विझवली. या आगीत गाडीचा काहीभाग पूर्णपणे जळाला असून मोठें नुकसान झाले आहे.
दरम्यान गाडीच्या मागे असलेले हनुमंत तोडकर यांनी फोन केल्याने मोठी दुर्घटना टळली व दैव बलवत्तर म्हणून आमचे कुटुंब वाचले अशी प्रतिक्रिया पत्रकार सचिन तोडकर यांनी दिली. तसेच गाडी पेटल्यानंतर आग विझविण्यासाठी सोळसे बंधू यांनी खूप मोलाची मदत केली याबाबत त्यांनी त्यांचे आभार मानले.