महायुतीच्या तीनही नेत्यांनी जागा वाटपासाठी ८० किंवा ९० अशा कुठल्याही आकड्याचा आग्रह धरला नाही. जेथे अजित पवार जिंकतील तेथे त्यांचा आग्रह, जिथे शिंदे गटाचे आमदार जिंकतील तेथे त्यांचा आग्रह व जेथे भाजपचे उमेदवार जिंकतील तेथे आमचा आग्रह मान्य करू.
आम्ही जिंकण्यासाठी लढण्याचा ‘फार्म्युला’ निश्चित केला असून आजवर ७० टक्के जागांवर एकमत झाले आहे, असे भाजपचे प्रदेश अध्यक्ष आ. चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले.
बावनकुळे सोमवारी पत्रकारांशी बोलताना म्हणाले, उद्धव ठाकरे यांना अडीच वर्षे सत्ता दिली. ते कधी मंत्रालयात गेले नाही. विधान भवनात गेले नाही. हे आता जुनी पेन्शन देऊ असे खोटे बोलत आहेत.
आमचे सरकार सगळे प्रश्न सोडवत आहे. सोयाबीन बासमतीच्या शेतकऱ्यांना फायदा झाला. शेतकऱ्यांचा पीक आल्यावर मोठा फायदा झालेला लवकरच दिसेल. संजय गायकवाड यांचे समर्थन करत नाही. आरक्षण रद्द करू असे राहुल गांधी म्हणाले.
नेहरू, राजीव गांधी आता राहुल गांधी, काँग्रेसच्या तीन पिढीच्या जे पोटात होते ते आज ओठात आले. एनडीए सरकार संविधान बदलणार असा प्रचार करण्यात आला. खरं तर काँग्रेसचा खरा चेहरा समोर आला.
खऱ्या आरक्षणाचे मारेकरी हे काँग्रेस आहे. जरांगे पाटील यांनी सुद्धा राहुल गांधी यांच्या वक्तव्यावर चर्चा केली पाहिजे, असेही बावनकुळे म्हणाले. देवेंद्र फडणवीस फक्त गणपती दर्शनासाठी अमिन पटेल यांच्या घरी गेले होते. यात नवीन आणि राजकारणासारखा काही नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.