“उद्धव ठाकरेंची अवस्था पाहून कीव येते. आज त्यांना महाविकास आघाडीसमोर कटोरा घेऊन फिरावं लागतं आहे. अशा अवस्थेत मी त्यांना यापूर्वी कधीच पाहिलं नाही. शरद पवारांना जो गेम करायचा होता, तो त्यांनी केला अन् दिवंगत बाळासाहेब ठाकरेंनी मजबुतीने बनवलेली भाजप-शिवसेनेची युती तोडली आणि उद्धव ठाकरेंना आमच्यापासून दूर नेले,” अशी टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली.
पुण्यात एएनआय वृत्तसंस्थेशी बोलताना बावनकुळे म्हणाले की, “आता शरद पवारांच्या नजरेत उद्धव ठाकरेंची उपयुक्तता संपली आहे. उद्धव ठाकरेंची अवस्था पाहून त्यांची कीव येते. त्यांना काँग्रेसच्या आणि शरद पवारांच्या घरी चकरा माराव्या लागत आहेत. पूर्वी मातोश्रीवर चर्चा व्हायच्या, पण आज उद्धव ठाकरे या लोकांच्या घरी जातात.
मातोश्रीची एक इमेज होती, ती उद्धव ठाकरेंनी गमावली. काँग्रेस कधीच उद्धव ठाकरेंना पसंत करत नाही. त्यांची अवस्था शोले चित्रपटासारखी झाली आहे. ‘आधे इधर, आधे उधर, मेरे साथ कोई नहीं.
बाळासाहेब ठाकरे म्हणाले होते की, ज्या दिवशी मला काँग्रेसकडे जाण्याची वेळ येईल, त्या दिवशी मी माझी शिवसेना बंद करेल. आज उद्धव ठाकरे काँग्रेसच्या घरी चकरा मारताहेत. आम्ही त्यांच्यासोबत युतीत होतो, त्यामुळे त्यांची ही अवस्था पाहवत नाही,” अशी बोचरी टीका त्यांनी यावेळी केली.
ते पुढे म्हणतात, “नाना पटोलेंनी स्वतःला मुख्यमंत्री घोषित केले, जयंत पाटील स्वतःला मुख्यमंत्री घोषित करत आहेत, वड्डेटीवारही स्वतःला मुख्यमंत्री घोषित करतात. शरद पवारांच्या मनात तर त्यांच्या मुलीला म्हणजेच, सुप्रिया सुळेंना मुख्यमंत्री करायचे आहे. उद्धव ठाकरे राज्याचे माजी मुख्यमंत्री आहेत.
तुम्ही त्यांना नेता मानत असाल, तर पटोले आणि इतरांची हिम्मत कशी होते स्वतःला मुख्यमंत्री म्हणवून घेण्याची. उद्धव ठाकरे माजी मुख्यमंत्री आहेत, शरद पवार किंवा काँग्रेस का त्यांना मुख्यमंत्री घोषित करत नाही. त्यांची गरज संपली आता. जे षडयंत्र रचायचे होते, ते रचले आणि आमची इतक्या वर्षांची युती तोडली,” अशी टीकाही बावनकुळेंनी यावेळी केली.