राज्य सरकारने अधिसूचना काढली आहे, त्यावर आक्षेप मागितले आहेत, अधिसूचना अंतिम करण्यापूर्वी सुनावणी होईल, त्यात आपले म्हणणे मांडता येईल, असे प्रतिपादन भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले. कुणबी नोंदी असूनही प्रमाणपत्र मिळत नव्हते, मात्र आता प्रमाणपत्र मिळणे सोपे होईल.
मराठा समाजाला वेगळे आरक्षण देण्याचा निर्णय सरकार घेईल, यापूर्वी फडणवीसांनी दिले होते, मात्र ज्याच्या कुणबी नोंदी आहेत, त्यांचा निर्णय झाला आहे. ओबीसीमध्ये ज्या कुणबी नोंदी आहेत, त्याबद्दलचा निर्णय झाला आहे. मराठा समाजाला वेगळे आरक्षण देण्यावर भाजप ठाम आहे. सर्वपक्षीय बैठकीत ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा आरक्षण देण्यावर एकमत झाले होते.
ओबीसींवर अन्याय होणार नाही, ओबीसी आरक्षण टिकवणे, ओबीसी मंत्रालय निर्माण करणे हे फडणवीसांनी काम केले आहे. दरम्यान,पंकजा मुंडेंची भूमिका भाजप विरोधी नाही. छगन भुजबळांनी वेगळी भूमिका घेतलेली नाही, आपले मत मांडण्याचा अधिकार सर्वांना आहे, पण मुख्यमंत्री आणि भुजबळ बसतील आणि कन्फ्युजन दूर करतील, असा विश्वास आहे.
राहुल नार्वेकर यांनी दिलेल्या निर्णयावर बोलताना उद्धव ठाकरेंच्या मना लायक निर्णय लागला नाही, राहुल नार्वेकर यांनी जो निकाल दिला, तो विधिमंडळाच्या नियमात जे आहे, त्यानुसार निर्णय दिला आहे. नार्वेकर अत्यंत योग्य आहेत, त्यांची निवड योग्य आहे. मताच्या राजकारणासाठी लोक किती खाली जातात, याची तक्रार करू आम्ही. इम्तियाज जलील यांची तक्रार योग्य ठिकाणी करू.
बावनकुळे म्हणाले, महायुतीचे जिल्हा मेळावे झाले आहेत, आता विभागीय मेळावे होतील. भाजप 48 जागांवर महायुतीच्या उमेदवारांना बळ देणार आहे. आमचे सुपर वॉरियर काम करतील, 50 हजार युनिट गाव चलो अभियान सुरू करतील. भाजपातील सर्व आमदार, खासदार आणि मंत्री गाव चलो अभियानातून संघटनात्मक बांधणी करणार आहेत.
4 फेब्रुवारी ते 11 फेब्रुवारीपर्यंत अभियान राबविले जाईल. रामटेकची जागा भाजपची असल्याकडे लक्ष वेधले असता जी मागणी आली आहे ती स्थानिक मागणी आहे, यासंदर्भात केंद्रीय पार्लमेंट्री बोर्ड ठरवेल, महाराष्ट्रात मोदींची गॅरंटी चालेल, हा विश्वास असून नजीकच्या काळात महाराष्ट्रात पक्ष प्रवेशाचे बॉम्ब स्फोट झालेले दिसतील, असा दावा केला.
वंचित बहुजन आघाडीचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी मुख्यमंत्री यांचे कौतुक करणे, हे मुख्यमंत्री चांगले काम करीत आहेत, याचे सर्टिफिकेट असल्याचे बावनकुळे म्हणाले.