लोकसभा निकालांबाबत अत्यंत आशावादी असलेल्या भारतीय जनता पक्षाने मित्रपक्षांना विधानसभेतील जागावाटपाबाबत दुखवायचे नाही असे धोरण ठरवले आहे.
भाजप हा मोठा भाऊ आहे पण मित्रपक्षांचा योग्य तो मान राखला जाईल असे विधान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले असतानाच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी समानपातळीवर चर्चा होईल. तोपर्यंत संयम बाळगावा, असे आवाहन मित्रपक्षांना केले आहे.
महायुतीतील मित्रपक्षांची बैठक लवकरच होणार असून त्या गोलमेज परिषदेपूर्वी जागांसंबंधीची जाहीर वक्तव्ये करू नयेत, असे आवाहन बावनकुळे यांनी केले आहे. मोठ्या पक्षाचा अध्यक्ष या नात्याने मी अन्य घटक पक्षांना ही विनंती करतो आहे असेही ते म्हणाले.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बैठकीत ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी भाजप -शिवसेनेच्या सरकारमध्ये प्रवेश करण्यापूर्वी ८० ते ९० विधानसभेच्या जागा देण्याचे आश्वासन दिले होते ते पाळावे, वक्तव्य असे केले आहे.
यानंतर महायुतीत सारे काही आलबेल नसल्याची चर्चा सुरू झाली. मात्र आज बावनकुळे यांनी ‘सकाळ’शी बोलताना वाद टाळायला हवेत अशी भूमिका घेतली आहे.
ते म्हणाले, ‘‘लोकसभा निवडणुकांचे निकाल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या यशावर शिक्कामोर्तब करणारे असतील. या निकालांनंतर आम्ही लगेचच सर्व सहकारी पक्षांची एकत्रित बैठक घेणार आहोत. ही बैठक ‘राउंड टेबल’ म्हणजेच गोलमेज असेल.
येथे सर्व सहकारी पक्षांना समान न्यायाने वागवले जाणार आहे. मी सर्वात मोठ्या पक्षाचा अध्यक्ष या नात्याने गोलमेज हा शब्द वापरतो आहे.’’ टक्केवारी वाढण्यासाठी समिती विधानसभेत मतदानाची टक्केवारी वाढावी, यासाठी भाजपने राज्यस्तरीय समिती स्थापन केली आहे.
केंद्रीय मंत्री डॉ. भागवत कराड यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती नेमली असून, विदर्भाचे संघटनमंत्री डॉ. उपेंद्र कोठेकर या समितीचे संयोजक असतील.