इंडी आघाडीकडे कुठलाच विकासाचा अजेंडा नाही. निवडून आले पण त्यांचा नेता ठरत नाही. संविधान, जात धर्माच्या आधारावर त्यांनी जनतेला भ्रमित केले, असा आरोप भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे केला.
नागपुरात आल्यावर त्यांनी विमानतळावर माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते. मुंबईत काल (दि. 5) उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लोकसभा निवडणुकीतील अपयशाची जबाबदारी स्वीकारत आपल्याला सरकारमधून मुक्त करा, अशी मागणी केली होती. त्यानंतर फडणवीस-बावनकुळे हे दोघेही गुरुवारी (दि. 6) नागपुरात आले.
यावेळी फडणवीसांनी माध्यांना प्रतिक्रिया देणे टाळले. पण बावनकुळे यांनी माध्यमांशी बोलताना, ‘फडणवीस यांच्याच नेतृत्वामध्ये महाराष्ट्रात विकासाच्या योजना आल्या.
सरकारमध्ये राहूनच त्यांनी पक्ष संघटना मजबूत करावी,’ असे म्हटले. ते पुढे म्हणाले, ‘देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याच नेतृत्वामध्ये पुढील पाच वर्ष केंद्रामध्ये सत्ता स्थापन होत असून, राज्यातही देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात पुढील निवडणुका होतील. त्यामुळे फडणवीस यांनी राजीनामा देऊ नये,’ असे स्पष्ट केले.
आज, गुरुवारी निवडणूक आयोग राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना नवनिर्वाचित खासदारांची यादी सोपविणार आहे. त्यानंतर अधिक संख्याबळ असलेल्या पक्षाला सत्ता स्थापनेसाठी आमंत्रित केले जाईल.
एनडीएच्या नेतेपदी नरेंद्र मोदी यांची निवड करण्यात आली असून, पंतप्रधान म्हणून ते लवकरच शपथ घेतील अशी शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर आज फडणवीस यांच्यासोबतच बावनकुळे देखील दिल्लीला जाणार असल्याची माहिती आहे.