
भाजप राज्यसभेसाठी चौथा उमेदवार देणार नाही, अशी माहिती भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे. त्यामुळे राज्यसभेची निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता आहे. याआधी भाजपकडून महाराष्ट्रातून राज्यसभेसाठी तीन नावे जाहीर करण्यात आली आहेत.
यात अशोक चव्हाण, मेधा कुलकर्णी आणि अजित गोपछडे या नेत्यांचा समावेश आहे. महाराष्ट्रातील राज्यसभेतील सहा जागांसाठी निवडणुका होत आहेत. त्यामुळे महायुतीकडून पाचच उमेदवार दिले जाण्याची शक्यता आहे.
तसं झाल्यास निवडणूक बिनविरोध होईल. आतापर्यंत महायुतीकडून चार उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत. शिंदेंच्या शिवसेनेकडून मिलिंद देवरा यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसकडून अद्याप उमेदवाराचे नावे जाहीर करण्यात आलेले नाही. तर काँग्रेसने चंद्रकांत हंडोरे यांचे नाव जाहीर केले आहे.
भाजपने एक मराठा चेहरा, एक ओबीसी लिंगायत चेहरा आणि एक ब्राह्मण चेहरा दिला आहे. त्यामुळे भाजपने जातीचे समीकरण देखील साधलं आहे. आतापर्यंत पाच उमेदवारांची नावे समोर आली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून आज रात्रीपर्यंत एका उमेदवाराच्या नावाची घोषणा होण्याची शक्यता आहे. १५ फेब्रुवारीपर्यंत उमेदवारांना राज्यसभा खासदारकीसाठी अर्ज भरावा लागणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने १५ राज्यांमधील राज्यसभेच्या ५६ जागांसाठी निवडणुकीची घोषणा केलीये.
भाजप नेते नारायण राणे यांना देखील पुन्हा राज्यसभेवर पाठवले जाण्याची शक्यता होती. पण, त्यांचा पत्ता कट करण्यात आला आहे. राणे लोकसभा निवडणूक लढवतील अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.
दुसरीकडे पंकजा मुंडे यांना राज्यसभेवर पाठवून त्यांची नाराजी दूर केली जाईल अशी चर्चा होती. पण, तसं झालेलं नाही. भाजपकडून उमेदवार म्हणून विनोद तावडे, अशोक चव्हाण, मेधा कुलकर्णी, डॉ. अजित गोपछडे, हर्षवर्धन पाटील, माधव भांडारी, अमरिश पटेल आणि विजया रहाटकर यांची नावे चर्चेत होती.