मराठा आरक्षणाचा घात करणारे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हेच आहेत. 2019 मध्ये त्यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्री पदाला विरोध केला नसता,
तर मुख्यमंत्री म्हणून फडणवीस यांनी सर्वोच्च न्यायालयात सर्व प्रयत्न करून मराठा आरक्षण टिकवले असते. त्यामुळे खऱ्या अर्थाने मराठा आरक्षणाचा घात कोणी केला असेल, तर ते उद्धव ठाकरे आहेत, असा आरोप भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला.
ज्येष्ठ नेते छगन भुजबळांनी जी भूमिका घेतली आहे, ती सर्वपक्षीय बैठकीत ठरलेल्या भूमिकेप्रमाणे आहे. त्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी आरक्षणाचा गुंता सोडवण्यासाठी काम करावे, असे ठरले होते.
तीच भुजबळांची भूमिका आहे. सर्वपक्षीय बैठकीत ठरल्याप्रमाणे सरकारने काम करावे. असेच सध्या भुजबळ बोलत आहेत. त्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या साक्षीने सांगितले होते की, मराठ्यांना वेगळं आरक्षण दिलं जाईल.
मराठा समाजाला जसे आरक्षण देवेंद्र फडणवीस सरकारने दिले. तसेच आरक्षण दिले पाहिजे आणि असेच छगन भुजबळांचेही म्हणणं आहे. मराठ्यांना आरक्षण देताना ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागू नये, या शब्दांत बावनकुळे यांनी भुजबळ यांच्या भूमिकेचे समर्थन केले.
भुजबळ मंत्री आहेत. मंत्रिमंडळाच्या बैठकीबद्दल बोलणं मी योग्य नाही. ते वेगळे काहीच बोलले नाही. मनोज जरांगे -पाटील बीडमधील हिंसेबद्दल जे आरोप लावत आहेत, तो चौकशीचा भाग आहे.
पोलीस त्याची चौकशी करत आहेत. त्याबद्दल मी बोलणे योग्य नाही. आज महाराष्ट्र जळत आहे. मराठा आणि ओबीसी समाज समोरासमोर येत आहेत. हे होऊ नये यासाठी जबाबदार उद्धव ठाकरे आहेत, असेही बावनकुळे म्हणाले.