मनोज जरांगे हे मतदानाच्या आदल्या दिवशी गावागावांमध्ये सकाळी दहा ते रात्री दोन वाजेपर्यंत फिरत होते. त्यांनी जातिवाद पसरवण्याचे काम केले. त्यामुळे माझे मताधिक्य कमी झाले, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (अजित पवार गट) ज्येष्ठ नेते आणि आमदार छगन भुजबळ यांनी गुरुवारी (दि. 28) केला.
पुण्यातील महात्मा फुलेवाडा येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमानंतर भुजबळ यांनी माध्यमांशी संवाद साधला. ईव्हीएम मशिनबाबत घेतल्या जाणार्या आक्षेबांबाबत बोलताना भुजबळ यांनी मी ईव्हीएम मशिनमुळे जिंकलो असेल, तर मग मला एक लाख मते मिळायला हवी होती. उलट माझे मताधिक्य वाढायला हवे होते. परंतु, 2019 पेक्षाही या वेळी माझे मताधिक्य कमी झाले आहे.
राज्याचे मुख्यमंत्री कोण होतील, या प्रश्नावर बोलताना भुजबळ यांनी देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री झाले, तर आनंदच आहे, असे मत व्यक्त केले. भुजबळ म्हणाले, ओबीसींचा मुख्यमंत्री व्हावा, यापेक्षा राज्यातील गोरगरिबांचे संरक्षण करणारा मुख्यमंत्री व्हावा, ही अपेक्षा आहे. भाजपचाच मुख्यमंत्री होईल, असे वाटते.
देवेंद्र फडणवीस यांनी मागील काही वर्षांमध्ये चांगले काम केले आहे. याआधीच ते मुख्यमंत्री व्हायला पाहिजे होते, पण एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले. फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रिपदावरही झोकून देऊन काम केले.
त्यांनी महायुतीला बहुमत मिळवून देण्यासाठी मेहनत घेतली. त्यामुळे भाजपला मोठे यश मिळाले. त्यामुळे मुख्यमंत्री होणे हा फडणवीस यांचा नैसर्गिक हक्क आहे. फडणवीस हेच राज्याचे पुढील मुख्यमंत्री होतील, याबद्दल त्यांना शुभेच्छा.