महायुतीचे सरकार हे सर्वसामान्य गोरगरीब, शेतकरी आणि महिलांचे हित जोपासणारे आहे. आम्ही आणलेल्या योजनांवर विरोधक टीका करत आहेत. फुकट कशाचे पैसे वाटता, या योजना निवडणूक जुमले आहेत, अशी टीका करत आहेत.
परंतु, प्रत्यक्षात लाभ सुरू झाल्याने लाडक्या बहिणींची होणारी गर्दी पाहून विरोधकांची धडकी भरली आहे, अशी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली.
मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियान आणि महिला मेळाव्यात ते बोलत होते. महाविकास आघाडीने त्यांच्या अडीच वर्षांच्या काळात केवळ हप्ते वसूल करण्याचे काम केले. त्यांचे गृहमंत्री जेलमध्ये गेले. पण, आमच्या सरकारने कधीच घेण्याचे काम केले नाही, तर देण्याचे काम केले, असे ते म्हणाले.
जनतेच्या दरबारात आता दूध का दूध आणि पाणी का पाणी होऊनच जाऊ द्या, असे आव्हान शिंदे यांनी विरोधकांना दिले. घरात बसून सरकार चालवता येत नसते, अशी टीकाही त्यांनी केली.