
नागपूर : महाराष्ट्र शिक्षक परिषदेने नागपूरच्या ५८० बोगस शिक्षक भरतीसंदर्भात गंभीर आरोप केला आहे. मृत शिक्षणाधिकाऱ्याची सही वापरुन १०० हून अधिक शिक्षकांची भरती केल्याचा धक्कादायक आरोप शिक्षक परिषदेने केला आहे. निवृत्त शिक्षणाधिकारी सोमेश्वर नैताम यांच्या मृत्यूनंतरही त्यांच्या सहीचा गैरवापर करण्यात आल्याची बाब उघड झाली आहे. या शिक्षक भरती घोटाळ्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गंभीर दखल घेतली आहे.
महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे कार्याध्यक्ष तसेच माजी शिक्षक आमदार गाणार सरांनी याबाबत माहिती दिली की, नागपुर जिल्हा प्राथमिक शिक्षणाधिकारी पदावर कार्यरत असलेले सोमेश्वर नैताम यांना २०१६ साली त्यांच्या सेवानिवृत्तीच्या दिवशी लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने धाड टाकून मोठ्या रकमेसहीत अटक केली होती.त्यानंतर काहीच दिवसांत त्यांचे निधन झाले. त्यांच्या मृत्यू पश्चात त्यांच्या बोगस सह्या असलेल्या Approval Order बोगस शिक्षक नियुक्तीत वापरण्यात आल्या. या ऑर्डर सन २०२४ पर्यंत काढण्यात आल्या. सोमेश्वर नैताम यांच्या मृत्यूनंतर पैसे घेऊन बोगस शिक्षकांच्या नियुक्ती करण्यात आल्या. या नियुक्ती सोमेश्वर नैताम हयात असताना झाल्याचे व त्या अधिकृत असल्याचे भासवण्यासाठी कागदोपत्री नैताम यांच्या बोगस सह्या करण्यात आल्या.
या नियुक्त्यांची चौकशी सुरु झाली असून, या शिक्षक भरती घोटाळ्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गंभीर दखल घेतली आहे. त्यामुळे आता ५८० अपात्र शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या नियुक्ती रद्द होण्याच्या मार्गावर आहेत. बनावट शालार्थ ओळखपत्राद्वारे शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या नियुक्ती करुन शासनाची कोट्यवधी रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. बोगस शिक्षकांच्या बॅंक खात्यावर पगार जमा झाल्याच्या नोंदींचीही तपासणी होणार आहे. या प्रत्येक बोगस नियुक्तीसाठी २० ते ३५ लाख रुपये घेण्यात आल्याची देखील माहिती समोर आली आहे. त्यामुळे आता पोलिसांकडून भरती झालेल्या बोगस शिक्षकांच्या बँक खात्यात आतापर्यंत एकूण किती पगार जमा झाला, याचीही तपासणी केली जाणार आहे. दरम्यान या सगळ्या प्रकरणाची एसआयटी मार्फत चौकशी करण्याची मागणी शिक्षक परिषदेने केली आहे.