ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत 103 दिवस जेलमध्ये गेले होते. एखादी व्यक्ती जेलमध्ये 103 दिवस गेल्यावर त्याच्या मानसिकतेवर परिणाम होतो. तसा परिणाम खासदार संजय राऊत यांच्यावर झाला आहे.
ते अजूनही त्या मनस्थितीतून परत आलेले नाहीत. त्यामुळे ते काहीही विधान करत असतात. त्यांना फारसे गांभीर्याने घेण्याची गरज नाही, असा टोला भाजपा महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी लगावला.
कराड येथे एका कार्यक्रमासाठी त्या आल्या होत्या. यावेळी पत्रकारांशी त्या बोलत होत्या. यावेळी कृष्णा सहकारी बँकेचे चेअरमन डॉ. अतुल भोसले, भाजपचे कराड शहराध्यक्ष एकनाथ बागडी यांची उपस्थिती होती.
चित्रा वाघ म्हणाल्या, मणिपूर भारताचा हिस्सा आहे. मणिपूरमध्ये यापूर्वी कोणतेही पंतप्रधान गेलेले नाहीत. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी अनेकदा गेले आहेत. त्या नॉर्थ इस्टला भारताशी कनेक्ट करण्याचे काम नरेंद्र मोदी यांनी केले आहे.
मणिपूरच्या विषयावर चर्चा करण्यासाठी अनेकदा नरेंद्र मोदी, व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी विरोधी पक्षांना पत्र दिले आहे. तरीसुध्दा ते आले नाहीत. त्यांनी केवळ मीडियावर चर्चा केल्या.
मणिपूरच्या घटनेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व राज्यांना निर्देश दिले आहेत की महिला व मुलींच्या सुरक्षतेचे कायदे अधिक कडक करा. लवकरच कायदा होणार आहे, असे वाघ यांनी सांगितले.