राज्यात प्रदूषणाचा प्रश्न गंभीर बनला आहे. यापार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज प्रदूषणाबाबत महत्त्वाची आढावा बैठक घेतली. यावेळी राज्यातील सर्व आयुक्त आणि जिल्हाधिकारी उपस्थित होते.
राज्यातील प्रदूषण कमी करण्यासाठी युद्ध पातळीवर काम करा. जे लागेल ते पुरवलं जाईल, असं मुख्यमंत्र्यांनी बैठकीत सांगितलं. मुख्यमंत्री शिंदे यांनी बैठकीनंतर पत्रकारांशी संवाद साधला.
ते म्हणाले की, दररोज मुंबईत सर्व प्रकारचे रस्ते धुण्यात यावेत असे निर्देश महापालिकेला दिले आहेत. तसेच आवश्यक भासल्यास आणखी फॉगर वापरता येतील. जे जे आवश्यक आहे, मशिन्स लागणार असतील तर त्या वापरण्याचे आदेश संपूर्ण राज्यातील महापालिका आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. पर्यटन विभागाला देखील दररोज लक्ष ठेवण्यास सांगितलं आहे.
प्रदूषणांचं प्रमाण युद्ध पातळीवर कमी करण्यासाठी सूचना दिल्या आहेत. याची अंमलबजावणी तात्काळ होईल आणि सर्व जनतेला दिलासा मिळेल. हायकोर्टाने ज्या सूचना दिल्या आहेत त्यांचे तंतोतंत पालन करण्याच्या सूचना संबंधितांना दिल्या आहेत.
पर्यावरण विभाग, आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांची बैठक झाली .हजारांच्या संख्येत पाण्याचे टँकर भाड्याने खरेदी करण्याच्या सूचना दिल्या आहेत. सर्व सूचनांचे प्रभावी अंमलबजावणी करण्यात येईल, असं शिंदे म्हणाले.
प्रदूषण रोखण्यासाठी मार्गदर्शक सूचना
क्लाऊड शेडिंगच्या सूचना दिल्या आहेत. पण काल पाऊस पडल्यामुळे याची गरज वाटत नाही. अद्ययावत यंत्रणा बसवण्याच्या सूचना दिल्या आहेत. मुंबई, पुणे ठाण्यात प्रदूषण वाढलं आहे.
त्यामुळे आवश्यक ती तयारी करण्यात येत असल्याचं शिंदे यांनी म्हटलं. दरम्यान, देशभरात प्रदूषणाचा प्रश्न गंभीर बनला आहे. दिल्लीची हवा अत्यंत वाईट या प्रकारात गेली आहे. दुसरीकडे मुंबई, पुणे शहरातही हवेचा दर्जा खालावला आहे.