अत्याचार, तसेच अश्लील कृत्य केल्याने १५ वर्षीय मुलाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. याप्रकरणी सहकारनगर पोलिसांनी एका तरुणाला अटक केली. त्याच्याविरुद्ध बालकांचे लैंगिक अत्याचारांपासून संरक्षण कायद्यान्वये (पोक्सो), तसेच आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.
संकेत राजेश माेहिले (वय २६, रा. धम्मपाल संघाजवळ, ३१८ भवानी पेठ आणि मोहननगर, धनकवडी) असे अटक करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी मुलाच्या वडिलांनी सहकारनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पीडित मुलगा आणि आरोपी संकेत मोहिले यांची ओळख होती. मोहिले याने मुलाला आमिष दाखवून वर्षभरापूर्वी तळजाई टेकडी परिसरात नेले. तेथे त्याने मुलाबरोबर अश्लील कृत्य तसेच अनैसर्गिक अत्याचार केले. मोबाइलवर छायाचित्रे काढली. त्यानंतर त्याने मुलाला धमकाविण्यास सुरुवात केली.
मुलाच्या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधून त्याला धमकावले. त्रासामुळे मुलाने १५ नोव्हेंबरला राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यानंतर मुलाच्या वडिलांनी पोलिसांकडे तक्रार दिली.
चौकशीत मोहिल याने मुलावर अत्याचार करुन त्याला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचे उघड झाले. त्यानंतर याप्रकरणी मोहिले याला अटक करण्यात आली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक छगन कापसे यांनी घटनास्थळी पाहणी केली असून, सहायक पोलीस निरीक्षक पवार तपास करीत आहेत.