सोलापुरात दूषित पाण्याचा पुरवठा; दोन विद्यार्थिनींचा मृत्यू, एकाची प्रकृती गंभीर

Photo of author

By Sandhya



सोलापुरातील बाबू जगजीवनराम झोपडपट्टीत दूषित पाण्यामुळे दोन १६ वर्षीय विद्यार्थिनींचा मृत्यू झाला, तर एकाची प्रकृती गंभीर आहे. या घटनेमुळे परिसरात शोक आणि संताप आहे. नातेवाईक दूषित पाण्याचा आरोप करतात.
सोलापुरातील मोदी परिसरातील बाबू जगजीवनराम झोपडपट्टीमध्ये दूषित पाण्यामुळे दोन विद्यार्थिनींचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना घडली आहे. तर एका मुलीची प्रकृती गंभीर आहे. या धक्कादायक घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे. या मुलींचे अनेक नातेवाईक आणि स्थानिकांनी दूषित पाण्यामुळेच मुलींचा मृत्यू झाल्याचा आरोप केला आहे. भाग्यश्री म्हेत्रे (१६) आणि जिया महादेव म्हेत्रे (१६) अशी या दोघींची नावे आहेत. तर जयश्री महादेव म्हेत्रे (१८) हिची प्रकृती चिंताजनक आहे.

आरोग्य विभागाच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह
या घटनेची माहिती मिळताच भाजपा आमदार देवेंद्र कोठे आणि महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त रवी पवार यांनी घटनास्थळी भेट दिली. बाबू जगजीवन राम झोपडपट्टीमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून दूषित पाण्याचा पुरवठा होत आहे. भाजपा आमदार देवेंद्र कोठे यांनीही या आरोपाला दुजोरा दिला आहे. या गंभीर घटनेनंतर आमदार कोठे यांनी महापालिकेच्या आयुक्तांनी कामचुकार कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे. दोन निष्पाप मुलींच्या मृत्यूमुळे सोलापूर महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.

या संदर्भात भाजपा आमदार देवेंद्र कोठे यांनी प्रतिक्रिया दिली. तसेच महापालिका अतिरिक्त आयुक्त रवी पवार यांनीही आपली बाजू मांडली. स्थानिक नागरिक आणि मृत मुलींच्या नातेवाईकांनी तीव्र भावना व्यक्त केल्या.

नागरिकांचा रस्त्यावर उतरून ठिय्या
दरम्यान, दोन मुलींच्या मृत्यूनंतर बाबू जगजीवन राम झोपडपट्टीतील नागरिक संतप्त झाले आहेत. त्यांनी आंदोलन सुरू केले आहे. झोपडपट्टीतील नागरिक रस्त्यावर उतरून ठिय्या आंदोलन करत आहेत. विशेष म्हणजे, हे आंदोलन काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदे यांच्यासमोर सुरू आहे. खासदार प्रणिती शिंदे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. या आंदोलनामुळे परिसरातील वातावरण तणावपूर्ण बनले आहे.

Leave a Comment