
महाशिवरात्रीनिमित्त नाशिकच्या त्र्यंबकेश्वर मंदिरात उद्या मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळीचा सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमात ती ‘शिवार्पणमस्तु’ नृत्य सादर करणार आहे. मात्र, या सादरीकरणाला त्र्यंबकेश्वर देवस्थानच्या माजी विश्वस्त ललिता शिंदे यांनी विरोध दर्शवला आहे. त्यांनी नाशिक ग्रामीण पोलिसांना पत्र लिहून याबाबत नाराजी व्यक्त केली आहे. त्यांच्या मते, महाशिवरात्री हा पवित्र दिवस असून मंदिराच्या प्रांगणात केवळ धार्मिक आणि शास्त्रीय कार्यक्रमच व्हायला हवेत. त्यांनी विशेषतः कथ्थक नृत्यासारख्या शास्त्रीय नृत्यप्रकारांना प्राधान्य देण्याची मागणी केली आहे. मंदिराच्या प्रांगणात सेलिब्रिटींना नृत्य सादर करण्यासाठी आमंत्रित करणे हा चुकीचा पायंडा असल्याचेही त्यांनी नमूद केले आहे.
माजी विश्वस्तांच्या या विरोधानंतर अद्याप त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्ट आणि प्राजक्ता माळी यांची अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. मागील काही महिन्यांपासून प्राजक्ता माळी बारा ज्योतिर्लिंगांच्या दर्शनासाठी प्रवास करत आहे, ज्यामध्ये भीमाशंकर आणि केदारनाथ ही दोन ज्योतिर्लिंगे शिल्लक आहेत. आता नाशिकमधील या कार्यक्रमावर विरोध झाल्यामुळे प्राजक्ता माळीचे नृत्य सादरीकरण होणार की रद्द केले जाणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.