
नाशिक : राज्यात सगळीकडे क्राईम वाढला आहे. खून ,बलात्कार , विनयभंग या बाबी नित्याच्या झाल्या आहेत. नाशिक शहर सुद्धा यापासून सुटले नाही. बुधवारी (दि १९) रात्री साडे अकरा वाजण्याच्या सुमारास आंबेकरवाडीत दोन सख्ख्या भावांचा रस्त्यावर कोयत्याने निर्घृण खून करण्यात आला.
उमेश उर्फ मन्ना जाधव व प्रशांत जाधव, अशी मृत्युमुखी पडलेल्या भावांची नावे आहेत. उमेश हा राष्ट्रवादी अजित पवार गटाचा पदाधिकारी होता, असे समजते.
रंगपंचमीच्या निमित्ताने जल्लोषाला दिवसभर संपूर्ण शहरात उधाण आलेले होते. रात्री शहर झोपी जात असताना उपनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पुणे महामार्गाला लागून असलेल्या आंबेडकरवाडीमध्ये एका सार्वजनिक शौचालयासमोर कोयतेधारी हल्लेखोरांनी जाधव बंधुवर जोरदार हल्ला चढविला. एकापेक्षा अधिक वार केल्याने रस्त्यावर रक्ताच्या थारोळ्यात दोघे कोसळले. ही बाब परिसरातील युवकांच्या लक्षात आली. यानंतर, दोघांना तातडीने शासकीय जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून त्यांना मृत घोषित केले. अतिरक्त रक्तस्त्राव झाल्याने दोघांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. घटनेची माहिती मिळतच शासकीय जिल्हा रुग्णालयात मोठ्या संख्येने गर्दी झाली होती.
पोलीस उपयुक्त मोनिका राऊत, सहाय्यक पोलीस आयुक्त सचिन बारी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे, पोलीस निरीक्षक मधुकर कड, सहाय्यक निरीक्षक हेमंत तोडकर यांचे पथक घटनास्थळी दाखल झाले होते. या घटनेने शहारात खळबळ उडाली आहे. हल्लेखोर फरार झाले असून चार पथके त्यांच्या शोधार्थ रवाना केल्याचे पोलीस उपायुक्त मोनिका राऊत यांनी म्हटले आहे.