
सायबर गुन्हेगारांचे जाळे – तीन घटना, एकच धडा : “विश्वास ठेवण्याआधी विचार करा!”
बारामती -बारामती शहर पोलीस स्टेशन हद्दीत अलीकडील काळात सायबर फसवणुकीच्या तीन गंभीर घटना उघडकीस आल्या असून, या तिन्ही घटनांमधून एक अत्यंत महत्त्वाचा धडा समोर आला आहे की, सायबर गुन्हेगार प्रथम नागरिकांचा विश्वास संपादन करतात आणि त्यानंतर विविध युक्त्या वापरून त्यांची आर्थिक फसवणूक करतात.
घटना क्रमांक १ Digital Arrest Scam
या घटनेमध्ये 74 वर्षीय ज्येष्ठ नागरिक महिलेला त्यांच्या मोबाईलवर WhatsApp द्वारे व्हिडिओ कॉल करण्यात आला. त्या कॉलमध्ये समोर असलेल्या व्यक्तीने स्वतःला पोलीस अधिकारी असल्याचे भासवून पोलीस गणवेशात बोलणे केले. संबंधित इसमाने महिलेला त्यांच्या विरुद्ध अटक वॉरंट असल्याचे खोटे सांगितले व “डिजिटल अरेस्ट” होईल अशी भीती दाखवून मानसिक दबाव निर्माण केला.
त्यामुळे महिलेला कोणाशीही संपर्क साधू नये, असे सांगण्यात आले आणि तपासाच्या नावाखाली त्यांचे पैसे सुरक्षित खात्यात जमा करण्यास सांगण्यात आले. या भीतीमुळे महिलांनी त्यांच्या Fixed Deposit (एफ.डी.) तोडून वेगवेगळ्या खात्यांवर पैसे ट्रान्सफर केले. अशा प्रकारे आरोपींनी त्यांच्याकडून एकूण ₹45,60,000/- रक्कम फसवणुकीने मिळवली.
घटना क्रमांक २ Investment / Trading Scam
दुसऱ्या घटनेमध्ये एका नागरिकाला WhatsApp वरील “Stock Market Experts” या नावाच्या ग्रुपमध्ये सामील करण्यात आले. त्या ग्रुपमधील व्यक्तींनी शेअर मार्केट, IPO व ट्रेडिंगमध्ये मोठा नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून संबंधित नागरिकाचा विश्वास संपादन केला.
त्यानंतर त्यांना एक मोबाईल ॲप डाउनलोड करण्यास सांगितले गेले, ज्यामध्ये सुरुवातीला खोट्या पद्धतीने नफा दाखवण्यात आला. त्यामुळे नागरिकाचा विश्वास अधिक दृढ झाला. त्यानंतर अधिक नफा मिळवण्यासाठी वारंवार पैसे गुंतवण्यास सांगण्यात आले. या आमिषाला बळी पडून संबंधित नागरिकाने विविध वेळेस मोठ्या रकमा जमा केल्या. शेवटी ॲप बंद झाले व आरोपींचा संपर्क तुटला. या प्रकारात संबंधित नागरिकाची एकूण 1,30,02,000/- इतकी मोठी फसवणूक झाली.
घटना क्रमांक ३ Account Hack (Online Banking Fraud)
बारामती शहर पोलीस स्टेशन हद्दीत एक गंभीर सायबर आर्थिक फसवणूक प्रकरण उघडकीस आले असून, अज्ञात सायबर गुन्हेगारांनी ऑनलाईन पद्धतीने 92,50,000/- इतकी मोठी रक्कम अपहार केल्याची घटना समोर आली आहे.
सदर प्रकरणात दिनांक 06/04/2026 रोजी सकाळी 08:00 ते 10:00 वा. दरम्यान, गिरीराज हॉस्पीटल, बारामती व संबंधित खातेदारांच्या बँक खात्यांमधून अनधिकृत ऑनलाईन व्यवहार (IMPS/RTGS) करून रक्कम विविध बँक खात्यांमध्ये ट्रान्सफर करण्यात आली.
सदर प्रकरणी बारामती शहर पोलीस स्टेशन येथे गु.र.नं. 132/2026 अन्वये भा.न्या.सं. कलम 318(4) तसेच माहिती तंत्रज्ञान अधिनियम 66(C), 66(D) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून, तपास सुरू आहे.
तपासात असे निष्पन्न झाले की, IMPS व RTGS या पद्धतीने विविध बँक खात्यांमध्ये पैसे पाठवण्यात आले होते. या घटनेमध्ये कोणताही फोन कॉल किंवा OTP शेअरिंग न करता खाते compromise करण्यात आले असून, एकूण 92,50,000/- रक्कम अपहार करण्यात आली.
वरील तिन्ही घटनांचा अभ्यास करता असे स्पष्ट होते की, आरोपी प्रथम नागरिकांचा विश्वास संपादन करतात, त्यानंतर भीती किंवा लोभ निर्माण करतात आणि शेवटी त्यांच्याकडून पैसे ट्रान्सफर करून घेतात.
नागरिकांनी लक्षात ठेवावे की, कोणताही व्यक्ती स्वतःला पोलीस, CBI, ED किंवा इतर सरकारी अधिकारी असल्याचे सांगून फोन किंवा व्हिडिओ कॉलवर अटक किंवा कारवाईची भीती दाखवत असेल तर त्यावर विश्वास ठेवू नये. तसेच WhatsApp, Telegram, Instagram यांसारख्या माध्यमांवर “Guaranteed Profit” किंवा “Double Money” यांसारख्या आमिषांना बळी पडू नये.
कोणतेही ॲप किंवा लिंक डाउनलोड करण्यापूर्वी त्याची खात्री करावी. OTP, PIN, पासवर्ड, बँक तपशील कोणालाही देऊ नयेत. तसेच AnyDesk, TeamViewer सारखी Remote Access ॲप्स अज्ञात व्यक्तींच्या सांगण्यावरून इंस्टॉल करू नयेत.
सायबर फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्वरित 1930 या राष्ट्रीय सायबर हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधणे अत्यंत आवश्यक आहे. जितक्या लवकर तक्रार नोंदवली जाईल, तितकी संबंधित रक्कम बँक खात्यांमध्ये फ्रीज करण्याची शक्यता वाढते.
सदर तिन्ही प्रकरणांमध्ये बारामती शहर पोलीसांनी गुन्हे नोंद करून तपास सुरू केला असून, संबंधित बँक खात्यांवर फ्रीज कारवाई करण्यात आलेली आहे. आरोपींचा शोध घेण्यासाठी तांत्रिक तपास सुरू आहे आणि काही प्रकरणांमध्ये रक्कम गोठवण्यात यश मिळाले आहे.
बारामती शहर पोलीस नागरिकांना आवाहन करीत आहेत की, कोणतीही संशयास्पद घटना घडल्यास त्वरित पोलीसांशी संपर्क साधावा. सायबर गुन्हेगार अत्यंत कुशल असले तरी जागरूक नागरिक त्यांच्यापासून स्वतःचे संरक्षण करू शकतात.
प्रभारी पोलीस निरीक्षक
बारामती शहर पोलीस स्टेशन
जि. पुणे ग्रामीण