कात्रज भागातील आंबेगाव परिसरात दहशत माजविणार्या गुंड टोळीवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मोक्का) कारवाई करण्याचे आदेश पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी दिले.
प्रेम अंकुश शिंदे (वय 23, रा. वेताळनगर, आंबेगाव बुद्रुक; मूळ रा. खरीव, ता. वेल्हा, जि. पुणे), गणेश ऊर्फ भावड्या बाबू ओव्हाळ (वय 24, रा. जय शिवाजी चौक, आंबेगाव बुद्रुक), भीमश्या सुरेश मुडावत (वय 19, रा. रचना हाईट, आंबेगाव बुद्रुक), करण रवी पटेकर (वय 20, रा. बालाजी पार्कसमोर, नर्हे) अशी मोक्का कारवाई करण्यात आलेल्या गुंडांची नावे आहेत.
प्रेम शिंदे टोळीप्रमुख आहे. त्याने साथीदारांशी संगमनत करून भारती विद्यापीठ, आंबेगाव भागात दहशत माजविली होती. या टोळीविरुद्ध खुनाचा प्रयत्न, खंडणी उकळणे, दहशत माजविणे, बेकायदा शस्त्र बाळगणे असे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत.
टोळीप्रमुख शिंदे आणि साथीदारांविरुद्ध मोक्का कारवाई करण्याचा प्रस्ताव भारती विद्यापीठ पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विजय कुंभार, गुन्हे शाखेचे निरीक्षक विजय पुराणिक, उपनिरीक्षक वैभव गायकवाड, चंद्रकांत माने, नरेंद्र महांगरे, महेश बारवकर, विशाल वारुळे यांनी तयार केला होता.
अतिरिक्त पोलिस आयुक्त प्रवीण पाटील, उपायुक्त स्मार्तना पाटील यांच्याकडे प्रस्ताव पाठविला होता. पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी या प्रस्तावास मंजुरी दिली. पोलिस आयुक्तांच्या आदेशाने आतापर्यंत शहरातील 27 गुंड टोळ्यांवर कारवाई केली आहे. सहायक आयुक्त नारायण शिरगावकर तपास करत आहेत.