हरियाणात चेहरा न दिल्यानं काँग्रेसचा पराभव? CM पदाच्या चेहऱ्यावरून ठाकरे पुन्हा आक्रमक

Photo of author

By Sandhya

ठाकरे

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अचानक आक्रमक झाले आहेत. मात्र महायुतीविरोधात नव्हे तर त्यांच्याच मित्रपक्षाविरोधात त्यांनी आक्रमक पवित्रा घेतलाय.. कारण काँग्रेसचा हरियाणात पराभव झालाय.

हरियाणा विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा पराभव झाल्यामुळे आता त्याचे पडसाद महाराष्ट्रातल्या मविआतही उमटायला लागले आहेत. हरियाणात मुख्यमंत्रिपदाचा चेहरा जाहीर न केल्यामुळेच पराभव झाल्याचा दावा ठाकरे गटाकडून करण्यात येतोय.

त्यामुळे ठाकरे गटानं पुन्हा एकदा मविआचा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा जाहीर करण्यासाठी आक्रमक पवित्रा घेतलाय. मविआतल्या कोणत्याही पक्षाच्या नेत्याचा चेहरा जाहीर करा मी पाठिंबा देतो, अशी भूमिका माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी जाहीररित्या मांडलीय.

काँग्रेसनं उद्धव ठाकरेंची ही मागणी वारंवार फेटाळून लावलीय. ज्याचे जास्त आमदार त्याचा मुख्यमंत्री हे सूत्र काँग्रेसनं यापूर्वीच पुढे केलंय. मात्र शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं आपण स्पर्धेतच नसल्याचं सांगत या वादातून स्वत:ची सुटका करून घेण्याचा प्रयत्न केलाय.

यावरच बोलताना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत म्हणाले आहेत की, ‘खांद्यावरील मुंडकं दिसायला हवं, नुसतं धड काय कामाचं?’ तर शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या की, ‘आम्ही मुख्यमंत्रिपदाच्या स्पर्धेत नाहीत.’

लोकसभेला महाराष्ट्रात सर्वाधिक यश मिळाल्यामुळे काँग्रेसचा आत्मविश्वास दुणावला होता. आणि त्यातूनच उघडपणे उद्धव ठाकरेंची मुख्यमंत्रिपदाचा चेहरा जाहीर करण्याची मागणीला काँग्रेसनं धुडकावून लावली होती. मात्र हरियाणातल्या पराभवामुळे उद्धव ठाकरेंनी संधी साधून काँग्रेसवर दबावाचं राजकारण सुरू केलंय. मात्र काँग्रेस या दबावाला बळी पडून नरमाईची भूमिका घेणार की आधीचीच भूमिका कायम ठेवणार याकडे लक्ष लागलंय. 

Leave a Comment