Deputy Speaker Dr. Neelam Gorhe’s work exudes the fragrance of Pandharpur soil – Chief Minister Devendra Fadnavis

“शिस्त, ठामपणा आणि संघर्षातून उभं राहिलेलं नेतृत्व”- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
तुम्हाला सोडून जाण्याचा निर्णय का घेतला याचा विचार करावा;उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांचा उद्धव ठाकरेंना टोला; शिंदेसाहेबांच्या खंबीर पाठिंब्यामुळे उपसभापतीपदावरून प्रभावी कामकाज करता आले
मुंबई ( दै.सध्या ) : महाराष्ट्र विधान परिषदेत (दि.२४ मार्च)रोजी निवृत्त होणाऱ्या ९ सदस्यांचा निरोप समारंभ पार पडला. यामध्ये उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्यासह उद्धव ठाकरे, अमोल मिटकरी, शशिकांत शिंदे, रणजितसिंह मोहिते पाटील, राजेश राठोड, दादाराव केचे, संजय केनेकर, संदीप जोशी आदी सदस्यांचा समावेश होता. या प्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी सर्व सदस्यांना निरोप दिला.
यावेळी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे या केवळ आमदार नसून सामाजिक कार्यकर्त्या, लेखिका आणि विचारवंत म्हणून त्यांची वेगळी ओळख आहे. महिलांच्या प्रश्नांवर त्यांनी सातत्याने लढा दिला असून पाच हजाराहून अधिक महिलांना न्याय मिळवून दिला आहे. सभागृहाचा विधायक उपयोग करून समाजहिताचे प्रश्न प्रभावीपणे मांडणाऱ्या सदस्यांमध्ये त्यांचे स्थान अग्रक्रमाचे असल्याचे त्यांनी नमूद केले.
तसेच डॉ. गोऱ्हे यांच्या कार्याचे कौतुक करताना म्हटले की, “त्यांच्या कार्यामध्ये पंढरपूरच्या पवित्र मातीचा सुगंध दरवळतो” असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
पुनरागमनाचे संकेत
डॉ. नीलम गोऱ्हे यांची विधान परिषदेतील टर्म संपत असली तरी, मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या भाषणात “ही केवळ निवृत्ती नसून पुन्हा येण्याचे संकेत आहेत,” असे विधान करून त्यांच्या राजकीय पुनरागमनाबाबत देखील सूतोवाच केले.
“शिस्त, ठामपणा आणि संघर्षातून उभं राहिलेलं नेतृत्व”- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले की, नीलम ताई यांनी सलग २४ वर्षे सभागृहात काम करत मोठा विक्रम केला आहे. उपसभापती म्हणून त्यांनी शिस्त, संतुलन आणि ठाम भूमिका ठेवत सभागृहाचा सन्मान वाढवला. त्यांनी उपसभापती म्हणून प्रभावी काम करत सत्य आणि न्यायाची भूमिका कायम ठेवली. त्यांना “शिवसेनेच्या रणरागिणी” म्हणत गौरविले. त्यांच्या स्पष्टवक्तेपणाचे कौतुक करत हलक्या फुलक्या शैलीत पुणेरी बाकरवडीचाही उल्लेख त्यांनी केला.
“लढाऊ नेत्या आणि संवेदनशील व्यक्तिमत्त्व”- उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी भावना व्यक्त करताना सांगितले की, डॉ. नीलम गोऱ्हे यांनी महिलांच्या प्रश्नांवर परखडपणे आवाज उठवला. एक लढाऊ महिला नेत्या आणि साहित्यिक म्हणून त्यांचे योगदान महत्त्वपूर्ण आहे. उपसभापती म्हणून त्यांनी अत्यंत चांगली कामगिरी केली असून त्यांच्याबद्दल अभिमान वाटतो, असे त्यांनी नमूद केले.
या प्रसंगी बोलताना उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी सांगितले की, ज्यांनी तुम्हाला सोडून जाण्याचा निर्णय घेतला, तो का घेतला याचा कधी विचार केला आहे का? तुम्ही केवळ आम्हालाच नाही तर अधिकाऱ्यांनाही भेटत नव्हता. जवळपास ६० ते ७० सहकाऱ्यांनी सोडून जाण्याचा निर्णय का घेतला त्याच तुम्ही आत्मपरीक्षण करावे, असा सवाल डॉ. गोऱ्हेंनी केला. माझ्या या विधानामुळे मला ट्रोल केले जाईल किंवा मी लोकांच्या निशाण्यावर येईल याची मला जाणीव आहे. पण सत्य बोलणे आता गरजेचे झाले आहे.
‘लख्ख पडला प्रकाश दिवट्या मशालीचा ,
गोंधळाला उभा गोंधळी भवानीचा ,
मी पणाचा दिमाख तुटला ,
अंतरंगी आवाज उठला ,
ऐरणीचा सवाल सुटला या कहाणीचा…’
असे सांगुन स्वतःच्या मनांत त्यांनी काय विचार केला याचे संकेत दिले.
नीलम गोऱ्हे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा उल्लेख करत सांगितले की, त्यांच्या नेतृत्वाखाली काम करताना आवश्यक ते सहकार्य, मार्गदर्शन आणि खंबीर पाठिंबा मिळाला, ज्यामुळे उपसभापती म्हणून जबाबदारी प्रभावीपणे पार पाडता आली. सर्व पक्षांच्या सदस्यांकडून मिळालेल्या सहकार्याबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली.
महिलांच्या न्यायासाठी काम करताना पक्षाने कधीही अडथळे आणले नाहीत, ही मोठी ताकद असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. सुमारे आत्मविश्वास वाढविण्यासाठी महिलांना कायदेशीर मदत,संवाद ,परिषदा आणि सामाजिक प्रश्नांवर सातत्याने काम केल्याचे त्यांनी नमूद केले.
राजकारणात स्पष्ट भूमिका घेणे आणि सत्याच्या बाजूने ठाम उभे राहणे हेच आपल्या कार्याचे ब्रीद राहिले असल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले.
‘असे जगावे दुनियेमध्ये,
आव्हानाचे लावून अत्तर,
नजर रोखुनी नजरेमध्ये,
आयुष्याला द्यावे उत्तर,
असे दांडगी इच्छा ज्याची,
मार्ग तयाला मिळती सत्तर,
नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर…’
या कवी गुरू ठाकुर यांच्या ओळी डॉ. गोऱ्हे यांनी सादर करत, भावनेतून त्यांनी आव्हानांना सामोरे जाण्याचा संदेश दिला तसेच सभागृह, सहकारी सदस्य आणि पक्ष नेतृत्वाचे आभार मानले.