शहराची हवा प्रदूषित होण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून, देशातील 131 प्रदूषित शहरांच्या यादीत पुण्याचा समावेश आहे. 2022 मध्ये शिवाजीनगर आणि हडपसर भागातील हवा सर्वाधिक प्रदूषित असून, कात्रज आणि पाषाणमधील हवा कमी प्रदूषित असल्याचे महापालिकेच्या पर्यावरण अहवालात नोंदविण्यात आले आहे.
महापालिकेच्या पर्यावरण विभागाने शहराच्या सद्य:स्थितीचा पर्यावरण अहवाल नुकताच प्रसिद्ध केला. यामध्ये शहराच्या दक्षिण आणि पश्चिम भागांपेक्षा पूर्व आणि उत्तर भागांत हवेच्या प्रदूषणाचे प्रमाण जास्त आहे.
नायट्रोजन डायऑक्साइडचे सर्वाधिक प्रमाण शिवाजीनगर, लोहगाव, हडपसर येथे जास्त, तर कात्रज आणि पाषाणमध्ये कमी आहे. कार्बन मोनोऑक्साइडचे सर्वाधिक प्रमाण लोहगाव आणि त्यानंतर शिवाजीनगर येथे आहे.
सूक्ष्म धूलीकण शिवाजीनगर आणि हडपसरमध्ये, तर अतिसूक्ष्म धुलिकणांचे प्रमाण शिवाजीनगर भागात सर्वांत जास्त आहे. नायट्रोजन डायऑक्साइडचे प्रमाण शिवाजीनगर, लोहगाव, हडपसर येथे जास्त आहे.
दरम्यान, राष्ट्रीय शुद्ध हवा उपक्रम राबविला जात आहे. त्यामध्ये देशातील 131 प्रदूषित शहरांची यादी तयार करण्यात आली असून, त्यात पुण्याचा समावेश आहे.
केंद्र सरकारने पुण्यातील हवा प्रदूषण कमी करण्यासाठी महापालिकेला उपाय योजना करण्याचे आदेश दिले आहेत. त्यासाठी 15 व्या वित्त आयोगाच्या माध्यमातून कामे केली जात आहेत.