नाशिक-पुणे रस्त्यावरील शिंदे गावात देवाची गादी चालवणाऱ्या एका 47 वर्षीय महिलेचा खून तिच्या राहत्या घरात चाकूने भोसकून करण्यात आला. खून करणारा संशशित हा महिलेचा परिचित असून, तिच्याकडे त्याच्यावर उपचार केले जात होते. उपचार करूनही लाभ मिळाला नाही म्हणून खून केल्याची कबुली संशयित आरोपीने पोलिसांना सायंकाळी दिली.
जनाबाई बेर्डे (शिंदे गाव, शिवरत्न चौक) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. शुक्रवारी दुपारच्या सुमाराला ही घटना घडली. निकेश दादाजी पवार (रा. जेलरोड, नाशिकरोड) असे खून करणाऱ्या संशयित आरोपीचे नाव आहे. घटनेच्या दिवशी जनाबाई बर्डे व निकेश पवार यांचे काही बोलणे झाले होते.
त्यानंतर वादविवाद होऊन संतप्त झालेल्या निकेशने जवळच असलेला चाकू काढला व जनाबाईच्या मानेवर तसेच शरीराच्या इतर भागांवर वार केले. त्यानंतर ती रक्ताच्या थारोळ्यात पडली व अतिरक्तस्रावामुळे मृत्युमुखी पडली. जनाबाईला अक्षय नावाचा मुलगा आहे, तर संशयित आरोपी निकेश पवार हा अविवाहित आहे.
दरम्यान ही घटना समजताच पोलिस उपआयुक्त चंद्रकांत खांडवी, सहायक पोलिस आयुक्त अंबादास भुसारे, पोलिस निरीक्षक पवन चौधरी, सहायक पोलिस निरीक्षक शेळके व सहकारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी आरोपीला तत्काळ अटक केली. या घटने प्रकरणी नाशिकरोड पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू असून, अधिक तपास सुरू आहे.