विधानसभेच्या आगामी निवडणुकीत आश्वासनांची खैरात करणारे राहुल गांधी यांचे ‘गॅरंटी कार्ड’ हे आधीच्या राजस्थान, छत्तीसगडमधील गॅरंटी कार्डसारखेच फ्लॉप होईल, अशी टीका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी येथे पत्र परिषदेत केली.
काँग्रेससह महाविकास आघाडीचे हे गॅरंटी कार्ड ६ नोव्हेंबरला प्रसिद्ध करण्यात येणार आहे. यासंदर्भात पत्रकारांनी विचारले असता फडणवीस म्हणाले की, असेच कार्ड राजस्थान, छत्तीसगडमध्येही राहुल गांधी यांनी जनतेसमोर मांडले होते, आश्वासनांचा वर्षाव केला होता; पण तरीही लोक भूलथापांना बळी पडले नाहीत.
तेलंगणा आणि हिमाचल प्रदेशात त्यांची सत्ता आल्यानंतर तेथे दिलेल्या गॅरंटी कार्डच्या अंमलबजावणीची काय स्थिती आहे, तेही काँग्रेसने सांगावे, असे आव्हान फडणवीस यांनी दिले. अजित पवार यांच्या चौकशीच्या फाईलबाबत विचारले असता, ती फाईल गोपनीय नव्हती.
कोणीही ती फाईल माहितीच्या अधिकारात मागवू शकते. आता आर. आर. पाटील हयात नाहीत, त्यामुळे या प्रकरणाबाबत अधिक बोलणे उचित ठरणार नाही, असे फडणवीस म्हणाले. काँग्रेसच्या गॅरंटी कार्डवर त्यांनी टीका केली.
नवाब मलिक यांचा प्रचार आम्ही करणार नाहीनवाब मलिक यांचा भाजप प्रचार करणार नाही, अशी स्पष्ट भूमिका आम्ही घेतली आहे. त्यांच्या मतदारसंघात आम्ही शिंदेसेनेच्या उमेदवाराचा प्रचार करणार आहोत. जर नवाब मलिक यांचा प्रचारच करणार नसू तर सरकार आल्यानंतर त्यांना कसे सरकारमध्ये घेणार, असे फडणवीस यांनी आणखी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले.